नवी दिल्ली - जागतिक पातळीवर अमेरिकेतील कोरोना रुग्णांची सर्वाधिक झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत २४०० लोकांनी जीव गमावला आहे. तर लागण झालेल्या रुग्णांची संख्या सव्वा लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अमेरिकेत ड्राईव्ह-थ्रू टेस्ट सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती कोरोनाची टेस्ट करू शकणार आहे.
ड्राईव्ह-थ्रू टेस्ट म्हणजे, तुम्ही कारने या किंवा आपल्या कारमध्ये बसून राहा. मेडीकल टीम तुमच्याकडे येईल आणि तुमच्या तोडातून आणि नाकातून स्वॅबचे नमूने घेईल. त्यानंतर तुम्ही लगेच घरी जावू शकता. तुमचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्यास तुम्हाला संपर्क करण्यात येईल. अर्थात सर्वांना ही टेस्ट करता येणार आहे.
अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची माहिती त्वरित मिळावी यासाठी ड्राईव्ह-थ्रू टेस्ट सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी आम्ही रणनिती आखली असल्याचे न्यूयॉर्कचे गव्हर्नर क्युमो यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, विविध राज्यांतील रिटेल स्टोअर्स, वॉलमार्ट, टारगेट आणि सीव्हीएस या ठिकाणी ड्राईव्ह-थ्रू टेस्ट सुरू करण्यात येईल. काही स्टोअर्सवर हे काम आधीपासूनच सुरू आहे. या टेस्टमुळे कोरोना बाधित रुग्णांची माहिती त्वरित मिळणार असून त्यामुळे योग्य त्या उपाययोजना करणे सोपं होणार आहे. यामुळे कोरोनाला प्रतिबंध घालण्यास मदत होणार आहे.