रियाध - सौदी अरेबियातील सरकारी तेल कंबनी असलेल्या अरामकोच्या दोन रिफायनरींवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर या रिफायनरींमध्ये मोठी आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार अरामको या सरकारी कंपनीच्या दोन मोठ्या तेल रिफायनरींना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यानंतर लागलेल्या भीषण आगीचा व्हिडीओ समोर आले आहे. अरामकोची सर्वात मोठी रिफायनरी असलेल्या बकीक येथे हल्ल्यानंतर धुराचे साम्राज्य पसरले होते. तसेच सौदीमधील खुरौस या तेलक्षेत्रात असलेल्या दुसऱ्या रिफायनरीवरही ड्रोन हल्ला करण्यात आला. त्यानंतर तिथेही मोठी आग लागली. दरम्यान, दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे वृत्त सौदी अरेबियातील सरकारी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. सौदी अरेबियामध्ये अशाप्रकारचे हल्ले यापूर्वीही झाले होते. त्या हल्ल्यांसाठी येमेनमधील इराण समर्थित हुती बंडखोरांना अशा हल्ल्यांसाठी जबाबदार धरले गेले होते. मात्र अरामको कंपनीवर झालेल्या हल्लांमागे कुणाचा हात आहे, याचा उल्लेख सौदी प्रसारमाध्यमांनी केलेला नाही. दरम्यान, हुती बंडखोरांच्या एका प्रवक्त्याने दावा केला की, या हल्ल्यासाठी दहा ड्रोन पाठवण्यात आले होते. दरम्यान, लष्कराचे प्रवक्ते याह्या सारए यांनी अल-मसिरह टीव्हीला सांगितले की, सौदी अरेबियावर भविष्यकाळात अशाप्रकारचे अजून हल्ले होऊ शकतात. हा हल्ला मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे जो हुती बंडखोरांनी घडवून आणला आहे. तसेच या हल्लासाठी सौदी सरकारमधील काही प्रतिष्ठित व्यक्तीनींही मदत केली आहे.'' मात्र सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी हुती बंडखोरांनी केलेल्या दाव्याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.