बगदाद : इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल् कादिमी यांची ड्रोनव्दारे हल्ला चढवून हत्या करण्याचा रविवारी पहाटे झालेला प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. ती ड्रोन पाडण्यात आली आहेत. या हल्ल्यातून कादिमी कसेबसे वाचले आहेत. मात्र, त्यांचे सात सुरक्षा रक्षक जखमी झाले. ड्रोन हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.
गेल्या महिन्यात इराकमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल मान्य करण्यास तेथील इराणसमर्थक दहशतवाद्यांनी नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला. यासंदर्भात पंतप्रधान मुस्तफा अल् कादिमी म्हणाले की, रॉकेट तसेच ड्रोनद्वारे भ्याड हल्ले करून देशाची उभारणी करता येत नाही. त्यांनी टीव्हीवर एक संदेश प्रसारित करून आपण सुरक्षित असल्याचे जनतेला सांगितले.
इराक सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, स्फोटके असलेल्या ड्रोनद्वारे इराकचे पंतप्रधान काधिमी यांच्या बगदादमधील निवासस्थानावर हल्ला करण्याचा व त्यांची हत्या करण्याचा कट हाणून पाडण्यात आला आहे. बगदाद येथे रविवारी पहाटे स्फोटाचा व त्यानंतर गोळीबार झाल्याचे आवाज स्थानिक नागरिकांनी ऐकले. हा सारा प्रकार अनेक देशांचे राजदूतावास व महत्त्वाची शासकीय कार्यालये असलेल्या ग्रीन झोनमध्ये घडला.
निदर्शकांवरील गोळीबाराचा निषेध
असैब अहल अल् हक या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कैस अल् खजाली याने सांगितले की, इराकमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अनेक गैरप्रकार झाले आहेत. त्याचा निषेध करणाऱ्यांवर गोळीबार करणे ही क्रूर घटना आहे. मुस्तफा अल् कादिमी यांच्या आदेशानेच निदर्शकांवर गोळीबार झाला असल्याचा आरोपही खजाली याने केला.
भारताने हल्ल्याचा केला तीव्र निषेध
इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल् कादिमी यांची ड्रोनद्वारे हत्या करण्याचा प्रयत्न झाला. त्या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. दहशतवाद व हिंसा या गोष्टींना कोणीही थारा देऊ नये. इराकमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना, तिथे अस्थिरता निर्माण करण्याचे होत असलेले प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. इराकमध्ये लोकशाही राजवट टिकून राहाणे आवश्यक आहे असेही भारताने म्हटले आहे.