तेल अवीव : इस्रायल आणि मित्रराष्ट्रांनी आपल्या हद्दीकडे इराणने प्रक्षेपित केलेल्या ३००हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांपैकी ९९ टक्के हवेतच उद्ध्वस्त केल्याचा दावा करीत इस्रायलने स्वत:ची आणि मित्रदेशांची पाठ थोपटली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सीरियातील इराणी वाणिज्य दूतावास इमारतीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने प्रथमच इस्रायलवर थेट ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. इस्रायलने सांगितले की, इराणने रविवारी पहाटे १७० ड्रोन, ३० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रे, १२० हून अधिक आंतरखंडीय क्षेपणास्त्रे सोडली. इस्रायल आणि अमेरिकी अधिकाऱ्यांनी हवाई हल्ल्याला दिलेल्या प्रत्युत्तराचे कौतुक केले. देश आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व करेल, अशी प्रतिक्रिया इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रियर एडम डॅनियल हगरी यांनी दिली.
तणाव कमी करा : भारताला चिंताइराण-इस्रायलमधील वाढत्या शत्रुत्वाने प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेला धोका वाढत असल्याबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. परिस्थिती मुत्सद्देगिरीच्या मार्गाने तत्काळ निवळण्याचे आवाहनही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी निर्देश जारी करत सुरक्षा निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले.
ब्रिटनने केली विमाने तैनातपंतप्रधान ऋषी सुनक यांनी इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याचा बेपर्वा वृत्ती म्हणून निषेध केला. दरम्यान, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी उशिरा सांगितले की, ड्रोन हल्ले रोखण्यासाठी अनेक अतिरिक्त हवाई दल, लढाऊ विमाने या प्रदेशात हलविण्यात आली आहेत.
‘त्यांनी प्रत्युत्तर देण्यापासून रोखले’रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. मध्य पूर्वेतील सरकारे मुत्सद्दी मार्गाने समस्यांचे निराकरण करतील, अशी आशाही रशियाने व्यक्त केली आहे. दूतावासाच्या इमारतीवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यापासून पाश्चात्त्य देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला रोखले, असा आरोपही रशियाने केला आहे.
१७ भारतीय अडकले- उत्तर केरळ जिल्ह्यातील एक वृद्ध जोडपे इराणने ताब्यात घेतलेल्या मालवाहू जहाजावरील आपल्या मुलाची सुटका कधी होते, याची वाट पाहत आहे. तो परत यावा यासाठी प्रार्थना करत आहे. - शनिवारी इराणी सैन्याने जप्त केलेल्या मालवाहू जहाजावर श्यामनाथ या त्यांच्या मुलासह १७ भारतीय अडकले आहेत. श्यामनाथचे वडील विश्वनाथन यांना यामुळे धक्का बसला आहे.