बरेच दिवस त्यांचा घसा दुखत होता... अन्न गिळतानाही त्रास होत होता... पण, साधंच काहीतरी असेल, असं समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं... हे दुखणं कायम असतानाच, एका पार्टीत ते दारू प्यायले... त्यानंतर त्यांना मळमळल्यासारखं वाटू लागलं... उलटी झाली... त्यात एक मांसाचा गोळाच बाहेर पडला... तो शरीराचा भाग असल्याचं समजून त्यांनी तो पाण्याबरोबर गिळून टाकला... पण, डॉक्टरांच्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष समोर आला...
ही घटना आहे चीनमधली. हुबेईमध्ये राहणाऱ्या एका ६३ वर्षीय व्यक्तीच्या बाबतीत ती घडली. उलटीमधून मांसाचा गोळाच बाहेर आल्यानं अर्थातच हे गृहस्थ घाबरले. त्यांनी लगेचच हॉस्पिटल गाठलं. एन्डोस्कोपिक टेस्टमधून असं लक्षात आलं की, जो मांसाचा गोळा उलटीवेळी बाहेर आला होता आणि या महोदयांनी शरीराचा भाग समजून जो गिळला होता, ती एक गाठ होती.
त्यानंतर, डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या केल्या. रुग्णाच्या संपूर्ण घशामध्ये, ज्या नलिकेवाटे अन्न पोटात जातं, तिथे १५ सेमी लांब आणि ४ सेमी जाडीची ही गाठ पसरल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. अखेर, शस्त्रक्रिया करून ती काढण्यात आली. ही गाठ आणखी वाढली असती तर अन्न गिळणं कठीणप्राय झालं असतं आणि श्वास गुदमरण्याचीही भीती होती, असं 'ओरिएंटल डेली'नं तज्ज्ञ डॉक्टरांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.