दुबईत बांधलेलं नवं आणि आकर्षक हिंदूमंदिर आज भाविकांसाठी खुलं होणार आहे. जेबेल अली येथे बांधलेलं हिंदूंचं हे पवित्र स्थळ दसरा सणाच्या एक दिवस आधी उघडण्यात येत आहे. मात्र, भाविकांना बुधवारपासून म्हणजेच उद्यापासून दर्शन घेता येणार आहे. दसऱ्याला हे मंदिर औपचारिकपणे लोकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. तब्बल ३५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे मंदिर पूर्ण झाले आहे. खलीज टाइम्सच्या रिपोर्टनुसार, दुबईमध्ये बांधलेले हे मंदिर सिंधी गुरू दरबार मंदिराचा विस्तार आहे, जे संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वात जुन्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची पायाभरणी फेब्रुवारी २०२० मध्ये झाली. या मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर या मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहेत.
दुबईत राहणाऱ्या भारतीयांची खूप पूर्वीपासून इच्छा होती की त्यांनी येथे पूजा करण्यासाठी मंदिर बांधलं जावं. हे मंदिर पूर्ण होणं म्हणजे त्या सर्व भारतीयांचं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे, जे वर्षानुवर्षे हिंदू श्रद्धास्थानाचा मार्ग शोधत होते. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, दसऱ्याला म्हणजेच ५ ऑक्टोबरपासून मंदिर अधिकृतपणे भाविकांसाठी खुलं केलं जाईल. या मंदिरात सर्व धर्माचे लोक येऊ शकतात. मंदिराचे अनौपचारिक उद्घाटन १ सप्टेंबरला आधीच झालं आहे. मोठ्या संख्येनं लोक उद्घाटन समारंभास उपस्थित होते आणि पांढर्या संगमरवरी बनलेल्या या मंदिराचं दर्शन घेतलं होतं.
UAE मधील भारतीय राजदूत असतील 'गेस्ट ऑफ ऑनर'मंदिर व्यवस्थापनाने सॉफ्ट ओपनिंगवर त्यांच्या वेबसाइटद्वारे QR-कोड-आधारित अपॉइंटमेंट बुकिंग प्रणाली सक्रिय केली होती. यावेळी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिराच्या व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार मंत्री शेख नहयान बिन मुबारक अल नाहयान हे मंदिराच्या औपचारिक उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर UAE मधील भारतीय राजदूत संजय सुधीर हे 'गेस्ट ऑफ ऑनर' असतील.
एका वेळी 1000 लोक भेट देऊ शकतीलहे मंदिर जेबेल अलीच्या 'पूजा गावात' आहे. या मंदिराजवळ गुरु नानक दरबार गुरुद्वारा आणि अनेक चर्च आहेत. यात १६ देवता आणि शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब आहे. मंदिराच्या वेबसाइटनुसार, मंदिरात येणाऱ्या लोकांना त्यांचा स्लॉट बुक करावा लागेल. अभ्यागत त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी देऊन अर्ध्या तासाचा स्लॉट बुक करू शकतात. याशिवाय तुमच्यासोबत येणाऱ्या लोकांची संख्याही द्यावी लागेल. एका गटात फक्त चार लोकांना परवानगी असेल. एका वेळी १००० हून अधिक लोक आरामात या मंदिराला भेट देऊ शकतात.