जालंधर : संयुक्त अरब अमिरातींमध्ये खुनाच्या दोन खटल्यांमध्ये देहदंडाची शिक्षा झालेल्या १५ भारतीयांच्या गळयाभोवतीचा फास दुबईमधील एका दानशूर भारतीय हॉटेल व्यावसायिकाने सोडविला आहे. एस. पी. सिंग ओबेरॉय असे या दानशूराचे नाव असून त्यांच्या दातृत्वामुळे ज्यांना जिवदान मिळाले त्यांत पंजाबमधील १४ व बिहारमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. फाशी टळल्याने पंजाबमधील हे सर्व १४ जण आपापल्या घरी पोहोचले आहेत तर कागदपत्रांची पूर्तता व्हायची असल्याने बिहारमधील व्यक्ती अद्याप घरी पोहोचलेली नाही.
पंजाब प्रेस क्लबने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मृत्युदंड होऊनही संयुक्त अरब अमिरातींमधून सुखरूप परत आलेले पंजाबमधील सर्व १४ आरोपी त्यांचे उपकारकर्ते ओबेरॉय यांच्यासेबत उपस्थित होते. या सर्वांनी ओबेरॉय यांचे मनापासून आभार मानले.संयुक्त अरब अमिरातींमधील इस्लामी कायद्यानुसार खून झालेल्या व्यक्तीचे कुटुंब व खुनी यांच्यात समझोता होऊन कुटुंबियांनी माफ केले तर खुन्यांना न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा रद्द होऊ शकते. खुन्याने हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला झालेल्या नुकसानीबद्दल ‘ब्लड मनी’ म्हणून काही रक्कम द्यायची व ती स्वीकारून कुटुंबाने खुन्याला माफ करायचे, असा सर्वसाधारणपणे हा समझोता असतो.
ओबेरॉय यांनी सांगितले की, या १५ खुन्यांना जीवदान मिळावे, यासाठी आपण आपल्या ‘सरबत दा खालसा ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मृतांच्या कुटुंबियांशी वाटाघाटी करून माफीसाठी त्यांचे मन वळविले. या लोकांच्या सुटकेसाठी आपण दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना मोठी रक्कम ‘ब्लड मनी’ म्हणून चुकती केली, असे ते म्हणले. मात्र, नेमकी रक्कम सांगण्यास त्यांनी नकार दिला. उभय पक्षांमधील हा समझोता संबंधित न्यायालयात सादर करण्यात आला व न्यायालयांनी त्यास संमती दिल्यानंतर या आरोपींची सुटका झाली, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशच्या आझमगढ जिल्ह्यातील विरेंद्र चौहान यांच्या सन २०११ मध्ये शारजामध्ये झालेल्या खुनाबद्दल पंजाबमधील चार व बिहारमधील एका आरोपीस तेथील न्यायालयाने फाशी ठोठावली होती. दुसरे प्रकरण मोहम्मद फरहान या पाकिस्तानी नागरिकाच्या आॅक्टोबर २०१६ मध्ये अल ऐन, दुबई येथे झालेल्या खुनाचे होते. त्यात पंजाबमधील १० आरोपींना फाशी झाली होती. या दोन्ही प्रकरणांमधील मृत व खुनी हे नोकरीनिमित्त संयुक्त अरब अमिरातींत गेलेले होते व आपसातील भांडणांतून हे खून झाले होते.
आखाती देशांमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या भारतीयांनी जो नाकरी देणार आहे, त्याची पार्श्वभूमी कसून तपासावी, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता तेथे जाण्यापूर्वी सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करावी आणि तेथे गेल्यावर कितीही आर्थिक अडचणी आल्या तरी बेकायदा धंद्यांमध्ये सहभागी होण्याचे कटाक्षाने टाळावे, असा सल्ला ओबरॉय यांनी दिला. आता त्यांनी जी दोन ताजी प्रकरणे हाताळली त्यातील खून बेकायदा दारू विक्रीच्या वादातून झाले होते. अरब देशांमध्ये अशा बेकायदा धंद्यांना अजिबात दयामाया दाखविली जात नाही.ओबेरॉय यांच्या ‘सरबत दा खालसा ट्रस्ट’ने आत्तापर्यंत संयुक्त अरब अमिरातींमध्ये फाशीची शिक्षा ठोठावलेल्या ९० जणांना अशा प्रकारे जीवदान दिले आहे. त्यासाठी ट्रस्टने संबंधित मृतांच्या कुटुंबीयांना ‘ब्लड मनी’ म्हणून २० कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली आहे.मदत करण्यात आलेले बहुतांश पंजाबमधील आहेत. पंजाबच्या प्रत्येक जिल्ह्यात ट्रस्टने कार्यालय सुरू केले आहे. आखातात नोकरीला जाण्यापूर्वी या कार्यालयांकडून सर्व माहिती घ्यावी, असे आवाहनही ओबेरॉय यांनी केले.