नवी दिल्ली : दुबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने भारतीय नागरिकांवर स्तुतिसुमने उधळली आहेत. तर पाकिस्तानचे नागरिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात, असे सांगत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. या दुबईच्या पोलीस अधिका-याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून भारतीयांचे तोंडभरून कौतुक केले. ट्विट करत तो म्हणाला, भारतीय लोक शिस्त पाळणारे आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानी लोक जास्त करून गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि विचित्र स्वभावाची आहेत.
धाही खालफान असे या पोलीस अधिका-याचे नाव असून, ते दुबईतील जनरल सिक्युरिटीचे प्रमुख आहेत. धाही खालफान यांनी ट्विटरवर पाकिस्तानच्या नागरिकांविषयी अशी आगपाखड केली आहे. असे सांगण्यात येत आहे की, येथील अधिका-यांनी पाकिस्तानच्या एका गॅंगला ड्रग्जची तस्करी करण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर धाही खालफान यांनी अशाप्रकारे ट्विट केले. पाकिस्तानी अखाती देशांसाठी धोकादायक ठरत आहेत. कारण, ते आमच्या देशात ड्रग्ज तस्करी करत आहेत. त्यांना दुबईक येण्यावर बंदी घातली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, धाही खालफान यांच्या ट्विटनंतर पाकिस्तानच्या मीडियाने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, धाही खालफान हे अशाप्रकारचे वादग्रस्त ट्विट करण्यात माहिर आहेत. त्यामुळेच त्यांचे ट्विटरवरील 2.66 दशलक्ष फॉलोवर आहेत.