जगभरात कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 10 कोटींवर गेली असून आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र याच दरम्यान कोरोना लसीचे काही साईड इफेक्टस समोर आल्याने लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना लसीबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्य़ा जात असतानाच अनेक लोक आणि संस्था लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करत आहेत.
दुबईतील रेस्टॉरंटमध्ये (Dubai restaurants) देखील असाच अनोखा प्रकार पाहायला मिळाला आहे. एका रेस्टॉरंट मालकाने कोरोनाची लस घेणाऱ्या ग्राहकांना खाण्याच्या पदार्थात मोठी सूट देण्याची घोषणा केली आहे. संयुक्त अरब आमिरात (United Arab Emirates) मधील एक कोटी लोकसंख्येतील एक चतृथांश म्हणजे तब्बल 25 हजार लोकांनी लस घेतली आहे. इस्राईलनंतर सर्वाधिक वेगाने दुबईत लसीकरण करण्यात आलं आहे. गेट्स हॉस्पिटॅलिटीअंतर्गत सुरू असलेल्या दुबईतील तीन रेस्टॉरंटने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
रेस्टॉरंटमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यास 10 टक्के आणि दुसरा डोस घेतल्यास 20 टक्के डिस्काऊंट मिळणार असल्याची हटके ऑफर दिली आहे. लंच, डिनर आणि ब्रेकफास्टवर सवलत हवी असल्यास ग्राहकांना कोरोना लस घेतल्याचा पुरावा म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेट दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर बिलावर आपोआप सूट मिळणार आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाचं स्वागत केलं आहे. दुबईसह सात आमिरातीपासून मिळून तयार झालेल्या यूएईने डिसेंबरपासून व्यापक लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केला होता.
यूएईने चीनी कंपनी सिनोफार्म, अमेरिकेतील औषध कंपनी फायजर आणि जर्मनीसोबत काम करणारी बायोनटेकच्या लसीच्या वापरासाठी हिरवा कंदील दिला आहे. दुबईतील हेल्थ एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात लसीकरण अभियानाची गती कमी करतील, कारण फायजरकडून सांगण्यात आलं आहे की, बेल्जिअमच्या त्यांच्या प्लांटमधून लस येण्यास वेळ लागू शकतो. तर सिनोफार्म लस सहजपणे उपलब्ध आहे. नवीन वर्षात कोरोना प्रकरणात वाढ होत असताना दुबईत पर्यटन, रेस्टॉरंट आणि आणि विविध सेवा सुरू आहेत. मात्र यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.