दुबई : संयुक्त अरब अमिराती (UAE) ची राजधानी दुबई (Dubai) येथे एक अतिशय चांगला उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोणताही गरजू रहिवासी उपाशी झोपू नये, यासाठी येथे उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. दुबईमध्ये जर एखाद्या व्यक्तीला भूक लागली असेल तर त्याच्यासाठी व्हेंडिंग मशीन्स (Vending Machines) बसवण्यात आल्या आहे.
या मशीन्समधून व्यक्ती मोफत ब्रेड घेऊ शकतात. या मशीन्समध्ये एका मिनिटात गरम आणि ताजा ब्रेड मिळतो. 'ब्रेड फॉर ऑल' ही मोहीम गेल्या आठवड्यात शनिवारी 17 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये सुरू करण्यात आली. दुबईमध्ये मोफत ब्रेड देण्यासाठी ठिकठिकाणी अनेक व्हेंडिंग मशीन्स बसवण्यात आल्या आहेत. वेंडिंग मशीनद्वारे मजूर, डिलिव्हरी रायडर्स आणि रोजंदारी मजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मशीन्स आधुनिक असून गरजूंसाठी ताबडतोब ब्रेड तयार करून त्यांना मोफत पुरवतात.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 'ब्रेड फॉर ऑल' मोहीम मोहम्मद बिन रशीद ग्लोबल सेंटर फॉर एंडॉवमेंट कन्सल्टन्सीद्वारे अवकाफ अँड मायनर्स अफेयर्स फाऊंडेशन (AMAF) अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. कारण, वंचित कुटुंबांना आणि मजुरांना दिवसाच्या वेगवेगळ्यावेळी मोफत ब्रेडची सोय करता येऊ शकेल. अनेक व्हेंडिंग मशीन्स (Vending Machines) किराणा दुकानाच्या प्रवेशद्वारावर ठेवल्या आहेत.
या मशीन्समध्ये सातत्यपूर्ण पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी दिवसातून दोनदा रिफिल केले जाते, ज्यामुळे लोकांना अरबी ब्रेड आणि फिंगर रोल यापैकी एक निवडण्याचा पर्याय मिळतो. एकदा 'क्लिक टू ऑर्डर' निवडल्यानंतर, मशीन ब्रेड तयार करण्यास सुरवात करते आणि एका मिनिटात मोफत गरम ब्रेड (Free Bread) वितरित करते.