नवी दिल्ली : शोधपत्रकारितेच्या जनक निले ब्लाय यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने या महिला पत्रकाराचे डुडल तयार करून आदरांजली वाहिली. गुगलने डुडलच्या माध्यमातून ब्लाय यांच्या भरीव कामगिरीचा सन्मान केला. गुगल या डुडलमुळे सोशल मीडियावर शोधपत्रकारितेबद्दल जोरदार चर्चा रंगली. ५ मे १८६४ मध्ये पीट्सबर्ग येथे निले ब्लाय यांचा जन्म झाला. गुगलने नव्या पिढीला ब्लाय यांच्या योगदानाची ओळख व्हावी या उद्देशाने एक लघुफीतही तयार केली आहे. डुडलमध्ये गुगलने ब्लाय यांच्यावर एक काल्पनिक वृत्तपत्र साकारले आहे. ब्लाय यांनी पिटस्बर्ग डिस्पॅच येथून वृत्तपत्रसृष्टीतील आपल्या कारकीर्दीस प्रारंभ केला. एलिझाबेथ जेन कोचरन या निले ब्लाय या टोपण नावाने जगभरात ओळखल्या जातात. त्यांनी अनेक वृत्तपत्रांमधून लेखन केले व गरीब, स्थलांतरितांसह महिलांचे अनेक वादग्रस्त मुद्दे जगासमोर आले. जगाच्या ८० दिवसांचा त्यांनी केलेला अद्भुत प्रवास अनेकार्थाने गाजला. या अद्भुत प्रवासाने त्यांना एक आगळीवेगळी ओळख दिली.अमेरिकेच्या त्या पहिल्या महिला युद्ध पत्रकार म्हणूनही ओळखल्या जातात. (लोकमत न्यूज नेटवर्क)पहिल्या महायुद्धाचे वार्तांकन त्यांनी केले होते.२७ जानेवारी १९२२ रोजी त्यांचे न्यूमोनियाने निधन झाले. हाँगकाँग, इंग्लंड, फ्रान्स, इजिप्त, सिंगापूर, सिलोन आणि जपान या देशांच्या ७२ दिवसांच्या प्रवासावर लिहिलेल्या त्यांच्या प्रवासवर्णनासही वाचकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.
शोधपत्रकारितेच्या जनक निले ब्लाय यांचे ‘डुडल’
By admin | Published: May 05, 2015 11:30 PM