लोकमत-
दुनिया की कोई भी ताकद हमें एक दुसरे से जुदा नहीं कर सकती. हिंदी चित्रपटांतला हा फेमस डायलॉग आपण अनेकदा ऐकला असेल. पण कोरोना व्हायरसनं भावी जोडप्यांनाच नाही, तर अख्ख्या जगातल्या लोकांनाच एकमेकांपासून ‘जुदा’ केलं आहे. घरातल्या घरातही अनेकांना आपल्या कुटुंबियांपासूनही किमान एक मीटर ‘दुरी’वर राहायची स्वसक्ती आली आहे. अशावेळी ज्यांनी ‘मरते दम तक’ एकमेकांच्या सोबतीनं राहण्याची कसम खाल्ली आहे, लवकरात लवकर शादीच्या बोहल्यावर चढायची घाई ज्यांना झालेली आहे, इतकंच नाही, तर सगळे ‘रस्मे-वादे’ पूर्ण करायची वेळ आली असताना, कार्यालयापासून तर भटजीपर्यंत आणि वाजंत्रीपासून ते अक्षतांपर्यंत सगळी तयारी झालेली असताना सगळ्याच गोष्टींना अचानक कफ्यरू लागल्यावर करायचं तरी काय? पण जगभरातल्या प्रेमवीरांनी यावरही शक्कल शोधून काढली! ‘मरते दम तक हमें कोई जुदा नहीं कर सकता’ हा नुसता डायलॉग नाही, तर ते आमचं वचन आहे, हे सिद्ध करून दाखवलं. कोरोनाच्या काळात लग्नाला दहा-बारा पाहुण्यांच्या उपस्थितीपासून ते लग्नच कॅन्सल होणं आणि मंगल कार्यालयाच्या चालकांना दंड ठोठावण्यापर्यंत अनेक घटना आपण पाहिल्या, पण प्रेमवीरांनी या कोणत्याही बंधनांना न जुमानता ऑनलाइन लगीनगाठ बांधण्याचा निश्चय केला आणि तो अंमलातही आणला. त्यातलंच जेफ आणि ख्रिस्ती हे अमेरिकेचं एक जोडपं. त्यांनी लग्नाचा निर्णय आधीच घेतला होता, पण देशाच्या सीमाच बंद झाल्यावर त्यांनी ऑनलाइन लग्नाचा निर्णय घेतला. प्रत्यक्ष लग्नापेक्षाही साग्रसंगीत हा सोहळा झाला. आकर्षक सजावट होती. सगळे वर्हाडी ऑनलाइन हजर होते. त्यांच्या साक्षीनं त्यांनी आपल्या सहजीवनाला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं, आमच्या आयुष्यातला अविस्मरणीय असा हा क्षण! परवाच तेलंगणामध्येही असाच ऑनलाइन ‘निकाह’ लागला! करीमनगरचा मोहम्मद अदनान खान कामानिमित्त सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये असतो. भारतात खम्माम येथे लग्न होतं. पण नवरदेव पोहोचूच शकणार नाही म्हटल्यावर दोन्हीकडच्या कुटुंबयांनी ऑनलाइन लग्न लावायचा निर्णय घेतला. त्यानुसार निकाह झाला. एवढंच नाही, सगळे धार्मिक विधि झाले, इजाब-ए- कुबुल झाला आणि ‘बिदाई’ही!..