ऑनलाइन लोकमतजोनान्सबर्ग, दि. 14 - सध्या सुरु असलेल्या दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी यासाठी दक्षिण आफ्रिकेतील क्रुगेर नॅशनल पार्क या सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी तेथील सुमारे ३५० पाणघोडे व रानरेड्यांना ठार मारणार आहेत.या जंगली जनावरांना मारल्यानंतर त्यांचे मांस राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात राहणाऱ्या गोरगरिबांना वाटले जाईल, असे नॅशनल पार्क सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.क्रुगेर नॅशन पार्कमध्ये सध्या ७,५०० पाणघोडे व ४७हजार रानरेडे असून त्यांची ही संख्या आजवरची सर्वाधिक आहे.या कारवाईमागचा विचार स्पष्ट करताना पार्क सर्व्हिसचे प्रवक्ते इक फाहला म्हणाले की, पाणघोडे आणि रानरेडे हे प्राणी खूप मोठ्या प्रमाणावर गवत व झाडपाला खातात. दुष्काळामुळे तृणभक्षक प्राण्यांच्या अन्नाची उपलब्धता कमी झाल्याने एरवीही यापैकी बरेच प्राणी उपासमारीने मेलेच असते. त्यांची संख्या पद्धतशीरपणे कमी केल्याने निदान उरलेल्या प्राण्यांना तरी उपलब्ध खाद्य जास्त दिवस पुरू शकेल.दक्षिण आफ्रिकेतील सध्याचा दुष्काळ हा गेल्या ३५ वर्षांतील सर्वात भीषण असल्याचे मानले जाते. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस असाच तीव्र दुष्काळ पडला होता तेव्हा क्रुगेर राष्ट्रीय उद्यानातील रानरेड्यांची संख्या सुमारे निम्मी म्हणजे १४ हजार झाली होती. मात्र नंतर ही संख्या पुन्हा वाढली होती.(वृत्तसंस्था)