लंडन : सर्वात गरम वर्ष म्हणून विक्रम केलेल्या २०१५ वर्षावर ‘अल निनो’चा जसा प्रभाव पडला, अगदी तशीच स्थिती आगामी वर्षात राहण्याची शक्यता आहे. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे २०१६ हे वर्षसुद्धा काही भागांत दुष्काळ, तर काही भागात पूर असेच असेल, अशी शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. रीडिंग विद्यापीठाचे डॉ. निक क्लिंगमन यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, ‘अल निनो’चा जबरदस्त प्रभाव जाणवतो आहे. तुम्ही त्याकडे कशा दृष्टिकोनातून पाहता याला महत्त्व आहे. उष्ण कटिबंधातील देशांमध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे. इंडोनेशियात दुष्काळ आहे, तर भारताचे सरासरी पर्जन्यमान १५ टक्क्यांनी कमी झाले आहे. ब्राझील व आॅस्ट्रेलियात कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्वात वाईट परिणाम आफ्रिकेत होण्याची शक्यता असून येत्या फेब्रुवारीत त्या भागात प्रचंड अन्नटंचाई जाणवेल असा अंदाज आहे. कॅरेबियन बेटे, मध्य व दक्षिण अमेरिकेलाही येते सहा महिने टंचाईचे आहेत. पृथ्वीचे वाढलेले तापमान व पर्यावरणाचा ढळलेला तोल हे दोन प्रमुख घटक या स्थितीला कारणीभूत असल्याचे क्लिंगमन यांनी सांगितले.
आगामी वर्षात एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे पूरपरिस्थिती
By admin | Published: December 31, 2015 2:55 AM