न्यूयॉर्क : अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमध्ये लोकसंख्येची घनता इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहे. तेथे दर वर्षी ६ कोटी पर्यटक भेट देतात. न्यूयॉर्कमधील गरीब वस्त्यांमध्ये आरोग्याचा दर्जा खालावलेला आहे. अशा एक ना अनेककारणांमुळे प्रचंड गर्दीच्या न्यूयॉर्क शहरामध्ये साथीच्या आजाराने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले.
न्यूयॉर्क शहरात १ लाख, ६० हजारांहून अधिक रुग्ण असून आतापर्यंत ७,८०० पेक्षा जास्त बळी गेले आहेत. येथे प्रचंड लोकसंख्या व पर्यटकांमुळेच कोरोना साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे गव्हर्नर अँड्र्यू कुओमे म्हणाले, न्यूयॉर्कची लोकसंख्या ८६ लाख असून प्रती चौरस किमी क्षेत्रात सुमारे १० हजार लोकराहतात. सार्वजनिक वाहतूक, रस्ते, भुयारी मार्ग या सर्व ठिकाणी नेहमी गर्दी असते. या ठिकाणी जास्त संसर्ग स्वाभाविक आहे.युरोपातून न्यूयॉर्कमध्ये आलेल्या पर्यटकांद्वारे संसर्ग झाला असावा, असे तज्ज्ञांना वाटते. येथे पहिला रुग्ण १ मार्च रोजी आढळला. या शहरात आर्थिक विषमताही मोठ्या प्रमाणावर आहे. ब्राँक्स, क्वीन्स येथील गरीब वस्त्यांमध्ये अनारोग्याचे प्रमाण जास्त आहे. त्यात आता या साथीची भर पडली. न्यूयॉर्कची वैद्यकीय यंत्रणा जगातील सर्वोत्कृष्ट यंत्रणांपैकी एक आहे. मात्र, ‘कोव्हिड-१९’मुळे एवढा हाहाकार माजेल असे तेथील सत्ताधाऱ्यांना वाटले नव्हते. कॅलिफोर्निया या आणखी एका दाट लोकवस्तीच्या शहरात तातडीने प्रतिबंधक पावले उचलल्याने तिथे तुलनेने संसर्ग कमी झाला आहे. बुधवारी व गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये रुग्णांची संख्या २०० ने वाढली. मात्र काही आठवड्यांपूर्वीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. असेच चित्र राहिले तर या रुग्णांच्या संख्येत यापुढे घटच होईल, असे गव्हर्नर अँड्र्यू कुओमो म्हणाले.अमेरिकेत दिवसभरात २ हजार जणांचा मृत्यू३ महिन्यांपूर्वी चीनमध्ये ही साथ सुरू झाल्यापासून या आजाराने कोणत्याही एका देशात, एका दिवसात २ हजारांहून अधिक मृत्यू झाले नव्हते. शुक्रवारी हे दुर्दैव बलाढ्य अमेरिकेच्या वाट्याला आले. जगातील मृत्युसंख्येनेही एक लाखाचा आकडा ओलांडला. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या नोंदींनुसार शुक्रवार रात्रीपर्यंतच्या २४ तासांत अमेरिकेत २,१०८ बळी घेतले. यामुळे देशातील मृत्यूंची संख्या १८,६९३ वर पोहोचली. बाधितांची संख्याही प्रथमच पाच लाखांच्या पुढे गेली.