वॉशिंग्टन - भारताने केलेल्या मिशन शक्ती या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र परीक्षणामुळे अंतराळात 400 तुकडे पसरल्याचे नासाने म्हटले आहे. तसेच या तुकड्यांमुळे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहत असलेल्या अंतराळवीरांनी धोक्याचा सामना करावा लागू, शकतो, अशी भीती नासाने वर्तवली आहे. गेल्या आठवड्यात केलेल्या मिशन शक्ती चाचणीमुळे भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर अंतराळात उपग्रह उद्ध्वस्त करण्याची क्षमता बाळगणारा जगातील चौथा देश बनला होता. दरम्यान, भारताने केलेल्या मिशन शक्तीबाबत नासाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांना संबोधित करताना नासाचे प्रमुख जिम ब्रिडेंस्टाइन यांनी भारताने घेतलेल्या या चाचणीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ''भारताच्या क्षेपणास्त्राने उद्ध्वस्त केलेल्या उपग्रहाचे सगळे तुकडे ट्रॅक करण्याइतपत मोठे नव्हते. सध्या आम्ही ज्या तुकड्यांचा मागोवा घेत आहोत. ते ट्रॅकिंगसाठी पुरेसे आहेत. आम्ही 10 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा मोठ्या तुकड्यांबाबत बोलत आहोत. असे सुमारे 60 तुकडे ट्रॅक करण्यात आले आहेत.भारताने आपला 300 किमी उंचीवरील उपग्रह क्षेपणास्राचा मारा करून उद्ध्वस्त केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आणि अन्य महत्त्वाचे उपग्रह ते 300 किमीहून अधिक उंचीवर स्थित आहेत. असे जिम ब्रिडेंस्टाइन यांनी सांगितले. ''या स्फोटात विखुरलेले 24 तुकडे असे आहेत जे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या एपोजीपासून वर जात आहेत. अवशेष एपोजीपासून वर जात असल्याने ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. अशा कृतींमुळे भविष्यात मानवाच्या अंतराळ स्वारीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ही कृती स्वीकार्य नाही.'' असा इशाराही ब्रिडेंस्टाइन यांनी दिला.
अमेरिकन सेना अंतराळातील प्रत्येक वस्तूवर लक्ष ठेवून असते. तसेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आणि अन्य उपग्रहांशी त्यांच्या होऊ शकणाऱ्या संभाव्य टक्करीबाबत इशारा देत असते. सध्या अंतराळात 10 सेंटीमीटरपेक्षा मोठे असलेले सुमारे 23 हजार तुकडे ट्रॅक झाले आहेत. त्यातील 10 हजार तुकडे हे अंतराळातील कचरा असून, 2007 मध्ये चीनने केलेल्या ASAT परीक्षणामुळे सुमारे 3 हजार तुकडे अंतराळात पसरले होते. चीनने हे परीक्षण 2007 मध्ये सुमारे 800 किमी उंचीवरा केले होते. दरम्यान, ब्रिडेंस्टाइन यांनी सांगितले की, भारताने केलेल्या परीक्षणानंतर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाशी असलेला टक्करीचा धोका गेल्या 10 दिवसांमध्ये 44 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र हे तुकडे जसजसे वातावरणात प्रवेश करताना जळून जातील तसतसा हा धोका कमी होईल.