इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. नवाझ शरीफ यांच्याविरोधात पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला असून, तेथील राज्यघटनेच्या कलम ६२ (१)(एफ)नुसार दोषी ठरलेली व्यक्ती आयुष्यभरासाठी दोषी मानली जाईल, असे स्पष्ट केले आहे.न्यायालयाने याच कलमांन्वये शरीफ यांना फेब्रुवारीमध्ये दोषी ठरवले होते. त्यामुळेच न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ शरीफ यांना सार्वजनिक पद स्वीकारता येणार नाही. म्हणजेच त्यांची राजकीय वाटचाल संपल्यात जमा आहे. याआधी त्यांना पक्षाध्यक्षपदीही राहता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. न्यायालयाने म्हटले होते की राज्यघटनेच्या अनुच्छेद ६२ व ६३नुसार दोषी ठरलेली कोणतीही व्यक्ती राजकीय पक्षाची प्रमुख असू शकत नाही. ‘डॉन न्यूज’ने दिलेल्या वृत्ताप्रमाणे ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने दिलेल्या निर्णयाने शरीफ भलतेच अडचणीत सापडणार आहेत.
नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 2:20 AM