लंडन- दक्षिण आफ्रिकेत होत असेलेल्या हिंसक निदर्शने व आंदोलनांमुळे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष सिरील राम्फोसा यांना राष्ट्रकूल बैठक सोडून परत जावे लागले आहे. लंडनमध्ये राष्ट्रकुल देशांच्या अध्यक्षांची परिषद सुरु आहे.
भ्रष्टाचार, बेकारी, घरांची उपलब्धता नसणे या विविध प्रश्नांमुळे दक्षिण आफ्रिकेच्या वायव्य प्रांतामध्ये आंदोलने, मोर्चे सुरु आहेत. कित्येक दुकाने लुटण्यात आली असून रस्त्यावरील बॅरिकेडस आणि वाहने पेटवून दिली आहेत. राम्फोसा यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली होती. इंग्लंड भेटीमध्ये आपल्या देशात अधिकाधिक गुंतवणूक व्हावी यासाठी ते प्रयत्न करणार होते मात्र आता त्यांना परिषदेतून माघारी परतावे लागले आहे. बुधवारपासून या वायव्य प्रांतात लोक निदर्शने करत असून त्यांनी प्रांताच्या प्रमुख्य प्रशासकांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.एलिझाबेथ राणीने दिली मंडेलांची पत्रेदक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील राम्फोसा यांनी इंग्लंडला गेल्यावर राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली होती. एलिझाबेथ यांनी त्यांना नेल्सन मंडेलांनी पाठवलेली पत्रे भेट म्हणून दिली. विंडसर कॅसल येथे या दोघांची भेट झाली होती. ही पत्रे 1994 साली दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रकुल संघटनेतील पुन:प्रवेशासंबंधी आहेत असे सांगितले जाते. इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचीही राम्फोसा यांनी भेट घेतली होती.