विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर बांगलादेशमध्ये दोन महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले होते. या सत्तांतरानंतर शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार जाऊन मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारची स्थापना बांगलादेशमध्ये झाली आहे. दरम्यान, या सत्तांतरानंतर बांगलादेशमधील परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली असून, येथे धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर टार्गेट करण्यात येत आहे. बंगालप्रमाणेच बांगलादेशी हिंदूही नवरात्रौत्सव आणि दुर्गा मोठ्या प्रमाणात साजरा करतात. मात्र बांगलादेशात यावेळी दूर्जा पूजेवरून वाद सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी हिंदूंना दुर्गा पूजेची परवानगी नाकारण्यात आली आहे. तर काही ठिकाणी देवीच्या मूर्ती तोडण्यात आल्याचे प्रकारही घडले आहेत.
बांगलादेशमधील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि मुस्लिम संघटनांनी हिंदूंना दुर्गा पूजा करण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे. देशामध्ये सुरक्षा व्यवस्था तितकीशी चांगली नाही. तसेच हल्ला होण्याचा धोका आहे, असं कारण परवानगी नाकारताना देण्यात आलं आहे. दरम्यान, ज्या मंडलांना दुर्गापूजेची परवानगी मिळाली आहे. त्यांच्यावरही जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. या मंडळांना नमाज सुरू असताना शांतता बाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. म्हणजेच नमाज पठण सुरू असताना पूजा किंवा भजन करता येणार नाही.
बांगलादेशमधील अनेक भागांमधून दुर्गा मातेच्या मूर्तींची तोडफोड झाल्याच्या बातम्या येत असतानाच हे आदेश देण्यात आले आहेत. आज सकाळीच किशोरगंज येथील बत्रिश गोपिनाथ जीउर आखाडा येथे दुर्गामातेची नवी मूर्ती तोडण्यात आली. तर कोमिला जिल्ह्यामध्येही दुर्गामातेची नवी मूर्ती तोडण्यात आली. तसेच मंदिरातील फंड पेटीही चोरून नेण्यात आली.
तर नारायण जिल्ह्यातील मीरापारा येथे दोन दिवसांपूर्वी कट्टरतावाद्यांनी एका दुर्गा मंदिरावर हल्ला केल्याची घटना घडली होती. दरम्यान, सरकारी सूत्रांनी सांगितले की, ९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दुर्गापूजेपूर्वी प्रत्येक मंडळाला प्रत्येकी ५ लाख रुपये जिझिया कर म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक समित्यांनी यावेळी दुर्गा पूजा आयोजित न करण्याच निर्णय घेतला आहे.