खराब अन्न शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. अमेरिकेतून एक असाच प्रकार समोर आला आहे. येथे गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 15 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचे वातावरण पसरले आहे. यानंतर संपूर्ण अमेरिकेतील स्टोअरमधून सेंद्रिय गाजर आणि बेबी गाजर परत मागवले जात आहेत. खरे तर, अमेरिकेत E. coli जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
गाजरांसंदर्भात CDC चा इशारा -यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) रविवारी (17 नोव्हेंबर) ग्रिमवे फार्म्सकडून मोठ्या सुपरमार्केट्सना विकण्यात आलेल्या गाजरांसंदर्भात चेतावणी जारी केली आहे. CDC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेतील एकूण 18 राज्यांमध्ये आतापर्यंत गाजरांशी संबंधित ई. कोली संक्रमणाचे 39 रुग्ण समोर आले आहेत. यानंतर, सीडीसीने लोकांना गाजर न खाण्याचा इशारा दिला आहे. सीडीसीने म्हटले आहे की, प्रभावित गाजर यापुढे यूएस स्टोअरमध्ये उपलब्ध नाहीत. परंतु लोकांच्या घरी असू शकतात. जे आधी फेकून देण्याची आवश्यक आहे.
दुसऱ्या देशांतूनही परत मागवले गाजर -यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहिती नुसार, यूएसमध्ये गाजराचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ग्रिमवे फार्म्सने कॅनडा आणि प्यूर्टो रिकोमधील स्टोअरमधून गाजर स्वेच्छेने परत मागवले आहेत. कॅलिफोर्निया स्थित ग्रिमवे फार्म्सने शनिवारी (16 नोव्हेंबर) एक प्रेस रिलीज जारी केले. यात कंपनीने म्हटले आहे की, कंपनी आपल्या शेती आणि कापणीच्या पद्धतींचा आढावा घेत आहे आणि अधिकाऱ्यांच्या सोबतीने काम करत आहे.
काय आहे ई. कोली बॅक्टेरियाचे संक्रमण?सीडीसीनुसार, एस्चेरिचिया कोली (ई. कोली) एका बॅक्टेरिया मुळे पसरणारे संक्रमण आहे. त्याचे बहुतेक प्रकार हानिकारक नाहीत. मात्र काही ई. कोली बॅक्टेरिया आहेत, जे शरिरात गेल्यानंतर जीवघेणे ठरू शकतात. यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोगांचा धोका वाढू शकतो. या बॅक्टेरियाच्या मुख्य लक्षणांमध्ये डिहाइड्रेशन, रक्तासह अतिसार, उलट्या, पोटदुखी आणि ताप यांचा समावेश होतो.