अबू धाबी - भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज 57 मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन (OIC) ला संबोधित केले. यावेळी भारताकडून दहशतवादाविरोधात उघडलेल्या मोहिमेवर बोलताना सुषमा स्वराज यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानवर नाव न घेता निशाणा साधला. दहशतवादाविरोधातील लढाई ही कुठल्याही एका धर्माविरोधात नसल्याचेही स्वराज यांनी स्पष्ट केले. इस्लामिक देशांच्या महत्त्वाच्या परिषदेत गेस्ट ऑफ ऑनर म्हणून निमंत्रण मिळाल्याने सुषमा स्वराज यांनी आभार मानले. दुसरीकडे या बैठकीत भारताला निमंत्रण मिळाल्याने जळफळाट झालेल्या पाकिस्तानने या संमेलनावर बहिष्कार टाकला आहे.
ओआयसीचे निमंत्रण आणि गेस्ट ऑफ ऑनरचा मान मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केल्यानंतर सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला घेरले. ''भारत दहशतवादाशी झुंजत आहे. दिवसेंदिवस जगभरात दहशतवाद फोफावत आहे. दक्षिण-पूर्व आशियामध्ये तर दहशतवाद आणि उग्रवाद चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे, असे सुषमा स्वराज म्हणाल्या. दहशतवादाविरोधातील लढाई ही कुठल्याही धर्माविरोधातील लढाई नाही. अल्लाचा अर्थ शांती असा होतो. मात्र दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, आसरा देणाऱ्या देशांविरोधात कारवाई झाली पाहिजे. दहशतवादी संघटनांना होणारी फंडिंग थांबली पाहिजे, असे आवाहनही सुषमा स्वराज यांनी यावेळी केले.
जर आपल्याला मानवतेला वाचवायचे असेल तर आपल्याला दहशतवादाला आसरा आणि अर्थपुरवठा करणाऱ्या देशाला हे प्रकार थांबवण्यास सांगावे लागेल. तसेच तिथे असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणावा लागेल, असेही स्वराज यांनी स्पष्ट केले.