परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज चीनच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबाबत चीन आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती दिली. रशिया, भारत आणि चीन (आरआयसी) या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत स्वराज सहभागी झाल्या आहेत. चीन आणि रशियासमोर भारताने एअर स्ट्राइक करण्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केले आहे. भारताने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले असून आता दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
सुषमा स्वराज यांनी 'पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण जग पाकिस्तानला जैश ए मोहम्मद आणि तिथे सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी संघटनांनाविरोधात कारवाई करण्यास सांगत होते. जैश ए मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारीही घेतली होती. या हल्ल्यात भारताच्या 40 जवानांना आपला जीव गमवावा लागला. तरीही पाकिस्तानने 'जैश' विरोधात कोणतेच पाऊल उचलले नाही. याच कारणामुळे भारताला ही कारवाई करावी लागली' अशी माहिती दिली आहे.
पुलवामा हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने घेतला असून यामुळे गर्भगळीत झालेल्या पाकिस्तानने आता एलओसीवरील नागरिकांच्या घरांचा आसरा घेण्यास सुरुवात केली आहे. घरांआडून पाकिस्तानचे सैनिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून भारतीय जवानांवर गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले करत आहेत. यामध्ये भारताचे 5 जवान जखमी झाले आहेत. तर पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. नौशेरा आणि बारामुल्ला भागात हे हल्ले करण्यात आले.
मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज-२000 विमानांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाकच्या हवाई हद्दीत प्रवेश केला आणि बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ले केले. हे हल्ले २१ मिनिटे सुरू होते. या हल्ल्याने बालाकोटचा सारा परिसर हादरून गेला. तिन्ही दहशतवादी तळ जंगलांमध्ये होते. आसपासच्या गावांतील लोक घाबरून बाहेर आले. त्यांनी स्फोटांचे प्रचंड आवाज येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस येईपर्यंत भारतीय हवाई दलाने आपली मोहीम फत्ते करून विमाने परतलीही होती.या हल्ल्यात ३२५ दहशतवादी आणि त्यांचे २५ कमांडर ठार झाले. तब्बल ४८ वर्षांनी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून ही कारवाई केली. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान भेदरला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. तब्बल ४८ वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हवाई दलाच्या जवानांनी ओलांडली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ साली अशी कारवाई केली होती आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र झाला होता.