वॉशिंग्टन - अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध सध्या चांगलेच ताणले गेले आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढाई करण्यासाठी देण्यात येणारी आर्थिक मदत रोखण्याचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे पाकिस्ताननेही अमेरिकेसमोर आपण केलेल्या उपकार आणि बलिदानाचे आकडे मांडले आहेत. दरम्यान मंगळवारी अमेरिकेने पाकिस्तानला आव्हान देताना मिळणारी खैरात बंद करा, आणि आपल्या हिंमतीवर कमवून दाखवा असं म्हटलं आहे. अमेरिका स्टेट डिपार्टमेंटकडून हे वक्तव्य करण्यात आलं आहे.
स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ता हिथर नॉर्टने सांगितलं की, 'पाकिस्तान अमेरिकेसाठी काय करु शकतं हे मला माहित नाही. पण त्यांनी काय केलं पाहिजे हे माहिती आहे'. ज्यावेळी पत्रकारांनी त्यांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सैन्य आणि आर्थिक मदत रोखण्यात येणार का ? असं विचारलं तेव्हा त्यांनी शांत राहणं पसंद केलं. त्या फक्त एवढंच बोलल्या की, 'पाकिस्तानला आपल्या हिंमतीवर कमवावं लागले. आम्ही गेल्या वर्षांमध्ये जी मदत केली त्याचा वापर दहशतवाद्यांविरोधात कशाप्रकारे करण्यात आला हे पाकिस्तानला दाखवावं लागेल'.
दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला भरभरून मदत केली पण त्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून अमेरिकेला फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकच मिळाली, असे खडे बोल सुनावत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून दिली जाणारी २५५ दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत बंद करण्याचे संकेत सोमवारी दिले होते.
गेल्या १५ वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलरहून अधिक आर्थिक मदत करण्याचा मूर्खपणा केला आणि आमचे (अमेरिकेचे) नेते मूर्ख आहेत, असे समजून त्या बदल्यात त्यांच्याकडून आमच्या वाट्याला फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकच आली. आता बस्स झाले!, असे आक्रमक स्वरुपाचे ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारलं.
पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देते असा आरोप करत ट्रम्प यांनी लिहिले की,' शेजारच्या अफगाणिस्तानात अमेरिका ज्या दहशतवाद्यांच्या मागावर आहे त्यांना पकडण्यास मदत करण्याऐवजी पाक त्यांना आश्रय देते'.