सात वर्षांची एक छोटीशी चिमुरडी. तिचं नाव लिझा स्कॉट. अमेरिकेच्या बर्मिंगहॅम शहरात तिच्या आजोबांची एक लहानशी बेकरी आहे. लिझाची आई ही बेकरी चालवते. कसंबसं निभावतं त्यांचं. घरात कमावणारं दुसरं कोणी नाही. कारण लिझाला वडील नाहीत आणि तिची आई सिंगल पॅरेंट आहे. तिच लिझाचा सांभाळ करते. पैशांची कमतरता असल्यानं मौजमजा, चैन परवडत नाही. लिझाला खेळणी, नवे कपडे, शूज घेण्यासाठीही तिची आई एलिझाबेथ तिला वेळेवर आणि पुरेसे पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे तिची फार तगमग होते, खूप अपराधी वाटतं. पण लहानग्या लिझाला आपली, आपल्या आईची, तिच्या कष्टांची आणि परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे तिनंच आईला सांगितलं, तू काही काळजी करू नकोस. मीच आता काहीतरी करते. लिझाला लेमोनेड - म्हणजे आपलं लिंबू सरबत- फार आवडतं. तिने आईच्या बेकरीमध्येच लेमोनेडचा स्टाॅल लावला. त्यातून थोडेफार पैसे मिळतील, आपल्याला खेळणी आणि शूज घेता येतील ही तिची माफक अपेक्षा. पण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अचानक या निरागस मुलीचं ध्येयच बदलून गेलं. तिला खेळणी आणि शूजचा हट्ट तिनं कधीच सोडावा लागला.
लिझाला मेंदूचा दुर्धर आजार झाला आहे आणि त्या ऑपरेशनसाठी खूप पैसे लागतील, हे कळल्यावर लिझाची आई एलिझाबेथच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढे पैसे कुठून जमा करणार, आपल्या मुलीवर उपचार कसे करणार या बेचैनीनं असंख्य रात्री तिनं रडून घालवल्या. अनेकांपुढे हात पसरले, पण या ऑपरेशनसाठी जेवढे पैसे लागणार होते, त्या तुलनेत हाती आलेले पैसे अगदीच किरकोळ होते. मग सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेली लिझा स्वत:च स्वत:च्या मदतीसाठी उभी राहिली. तिनं आपलं लिंबू सरबत विकणं तसंच सुरू ठेवलं, फक्त येणाऱ्या ग्राहकांना ती सांगू लागली, ‘तुम्ही मला फुकट काही देऊ नका, पण या लिंबू सरबतच्या मोबदल्यात तुम्हाला वाटेल, जमेल, शक्य असेल तेवढी मदत मात्र माझ्या ऑपरेशनसाठी नक्की करा’ - आपल्या या योजनेला तिने नाव दिलं ‘लेमोनेड फॉर लिझा’ चिमुरडीच्या या भावनिक आवाहनांना आणि तिच्या निस्वार्थ अपेक्षेनं अनेक जण हळहळले आणि लिंबू सरबतच्या बदल्यात तिला अधिक पैसे देऊ लागले. अल्पावधीतच तिचं दुकान फेमस झालं आणि खूप लोक तिच्याकडे सरबत घेण्यासाठी येऊ लागले. ज्यांना पैसे देणं शक्य नव्हतं, अशा अगदी गरीब लोकांनीही तिच्या दुकानाला भेट दिली आणि तिच्या हातचं लिंबू सरबत पिऊन, त्याचे पैसे आणि आशीर्वाद देऊन ते निघून गेले. लिझा सांगते, अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या. माझं लिंबू सरबत विकत घेताना कोणी पाच डॉलर, कोणी दहा डॉलर तर कोणी अगदी शंभर डॉलरपर्यंत पैसे दिले.
लिझाला मेंदूचा असा काही गंभीर आजार आहे, हे तिची आई एलिझाबेथला गेल्या जानेवारीपर्यंत माहीतच नव्हतं. पण जेव्हा कळलं तेव्हा त्यांचे धाबंच दणाणलं. कारण हा अतिशय दुर्धर असा आजार आहे. पण लिझा हरली नाही. तिने लेमोनेड विकून अवघ्या काही दिवसात तब्बल १२ हजार डॉलर्स कमावले. लिजाचं म्हणणं आहे, भीक मागण्यापेक्षा हा मार्ग खूपच उत्तम आहे. याशिवाय लिजानं ऑनलाईन फंड रेजरचाही मार्ग अवलंबला . या साऱ्या माध्यमातून मिळून एलिझाबेथ स्कॉट यांच्याकडे एकूण ३ लाख ७० हजार डॉलर्सची पुंजी जमा झाली.
लिझावर किमान दोन मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील. डॉक्टरांचं म्हणणं आहे, येत्या काळात कदाचित अजूनही काही शस्त्रक्रिया तिच्यावर कराव्या लागतील. अशा प्रकारच्या दुर्धर आजारात सर्वसामान्यपणे मेंदूत एकाच प्रकारचा बिघाड दिसून येतो, पण लिझाच्या मेंदूत तीन वेगवेगळ्प्रा यकारचे किचकट बिघाड आहेत. त्यावर तातडीनं उपाय झाले नाहीत, तर मेंदूच्या रक्तवाहिन्यांत गाठी तयार होणं, ब्रेनहॅमरेज होणं, मेंदूत रक्तस्त्राव होणं किंवा अटॅक येणं अशा प्रकारचे गंभीर दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. लिझा म्हणते, आय ॲम नॉट स्केअर्ड, बट आय ॲम वरीड !” लिझाचा मेडिक्लेम असला तरी तो खूपच तुटपुंजा आहे. तिच्या ऑपरेशनसाठी अजून किती पैसे लागतील हे खुद्द डॉक्टरांनाही माहीत नाही. लिझाच्या कहाणीनं अनेकांना भावूक केलं आहे, अनेकांनी तिला मदतही केली, पण तिच्या कहाणीवरुन अमेरिकेत आता नवीनच चर्चेला तोंड फोडलं आहे. आपल्या आरोग्यावरील उपचारासाठी एवढ्या लहान मुलीला स्वत:च कष्ट करावे लागताहेत ही सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. अमेरिकी स्वास्थ्य प्रणाली शेवटचे आचके देत आहे आणि अशा प्रसंगीही ती कामाला येत नसेल तर काय कामाची, असे ताशेरेही अनेकांनी ओढले आहेत.
लिझाची आई म्हणते, गॉड इज गुड !गेल्या सोमवारीच बोस्टनच्या चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये लिझाच्या मेंदूवरची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तिच्या आईने सगळ्यांचे आभार मानता फेसबुकवर लिहिलं, लिझा शुद्धीवर आली आहे. गॉड इज गुड !