काठमांडू : नेपाळमधील दोती जिल्ह्यात बुधवारी पहाटे 6.3 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. या घटनेत एक घर कोसळून जवळपास सहा जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर, बुधवारी रात्री दोनच्या सुमारास दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार (एनसीएस) , भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती. नेपाळमध्ये गेल्या पाच तासांतील हा दुसरा भूकंप (Earthquake) आहे.
नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागढपासून 90 किमी अंतरावर भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, नेपाळच्या भूकंपातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांमध्ये किमान एक महिला आणि दोन मुलांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नेपाळमध्ये पाच तासांच्या कालावधीत हा दुसरा भूकंप आहे. बुधवारीही रात्री 8.52 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी होती.
एनसीएसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किमी खाली होती. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊसह अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये 8 नोव्हेंबरला 9.41 वाजता आणि 8.52 वाजता भूकंप झाला होता. त्यांची तीव्रता 5 पेक्षा कमी होती. दरम्यान, भूकंपानंतर अर्ध्या तासात #earthquake 20,000 ट्विटसह ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात झाली. एवढा जोरदार भूकंप कधीच जाणवला नसल्याचे ट्विट काही लोकांनी केले.
यापूर्वी नेपाळमध्ये झाला होता मोठा भूकंपयापूर्वी 2015 मध्ये नेपाळमध्ये राजधानी काठमांडू आणि पोखरा शहरादरम्यान 7.8 रिश्टर स्केलचा उच्च-तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपात 8,964 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 22,000 जण जखमी झाले होते, असे म्हटले जाते. हा भूकंप गोरखा भूकंप म्हणून ओळखला जातो. या भूकंपाचा धक्का उत्तर भारतातील अनेक शहरांना बसला होता. तसेच, पाकिस्तानातील लाहोर, तिबेटमधील ल्हासा आणि बांगलादेशातील ढाका येथेही भूकंपाचे धक्के जाणवले होते.
भारतात कुठे बसले धक्केबुधवारी पहाटे राजधानी दिल्ली आणि लगतच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राजधानीतील अनेक भागात रात्री 1.57 च्या सुमारास या भूकंपाच्या धक्क्यांनी लोक अचानक जागे झाले. दिल्लीसोबतच मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.