काठमांडू : युरोपच्या सेंटिनल-१ ए या उपग्रहाकडून मिळालेल्या ताज्या माहितीवरून भूकंपादरम्यान काठमांडूच्या आसपासचे एक मोठे क्षेत्र एक मीटरपर्यंत वर उचलले गेले आहे. हा रडारयुक्त उपग्रह आपल्या कक्षेतून घेतलेल्या आधीच्या व नंतरच्या छायाचित्रांची तुलना करून जमिनीवरील बदलांचा शोध लावू शकतो. शास्त्रज्ञांनी उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीचे एका इंटरफेरोग्रामद्वारे विश्लेषण केले आहे. इंटरफेरोग्राम एक रंगीत; परंतु गुंतागुंतीचा तांत्रिक नकाशा असतो. ज्याद्वारे पृथ्वीतील प्रस्तरभंगाच्या समांतर होणारी जमिनीची स्थलांतर क्रिया समजून येते. इंग्लंडच्या नेर्क सेंटर फॉर द आॅब्जर्व्हेशन अॅण्ड मॉडलिंग आॅफ अर्थक्वेक, वॉल्कॅनोज अॅण्ड टेक्टोनिक्सचे (कोमेट) प्रोफेसर टीम राईट यांनी सांगितले की, जमीन वर उचलली जाण्याची घटना काठमांडूच्या वायव्येकडे घडली आहे. वस्तुत: आम्ही इंटरफेरोग्राममधील रंगीत ‘फ्रिंज’ तरंगांना मोजतो. यात एकूण ३४ फ्रिंज आहेत म्हणजे एक मीटरहून अधिक उंचवटा. इंटरफेरोग्रामवरून हे लक्षात येते की, काठमांडूच्या उत्तरेकडे जमीन थोडी खचली आहे. छोट्या धक्क्यानंतर असे होणे ही सामान्य बाब आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
भूकंप : काठमांडूृजवळील क्षेत्र १ मीटरने उंचावले
By admin | Published: May 02, 2015 11:11 PM