मराकेश - साखरझोपेत असतानाच आलेल्या मोरोक्कोमधील विनाशकारी भूकंपात मृतांची संख्या २ हजारपेक्षा अधिक झाली असून, किमान २,०५९ जण जखमी झाले आहेत. यातील १,४०४ जणांची प्रकृती गंभीर आहे. अनेक कुटुंबे झोपेत असल्याने भूकंपानंतर घराबाहेर पडण्यात अपयशी ठरली, यामुळे ती ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या येथे बचावकार्य वेगात सुरू असून, त्यातही अनेक अडथळे येत आहेत.
मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अल-हौज प्रांतात सर्वाधिक १,२९३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. किमान २,०५९ लोक जखमी झाले असून, अनेकांची प्रकृती गंभीर आहे. येथील ३ लाख लोकांना भूकंपाचा फटका बसला आहे. भूकंपानंतर मोरोक्को सरकारने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मोरोक्कोमध्ये शुक्रवारी ६.८ रिक्टर स्केलचा भूकंप झाला, जो गेल्या १२० वर्षांतील देशातील सर्वांत भीषण भूकंप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक देशांच्या नेत्यांनी मोरोक्कोला मदत करण्याची घोषणा केली आहे.
भारतीयांना फटका बसला का? nमोरोक्कोमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू अथवा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, अशी माहिती येथील भारतीय दूतावासाने दिली आहे. nआम्ही भारतीय लोकांच्या संपर्कात असून, नागरिकांनी संयम बाळगावा. भारतीय नागरिक कोणत्याही मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकतात, तो २४ तास उपलब्ध आहे. या कठीण काळात मोरोक्कोला मदत करण्यास भारत तयार आहे, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
भूकंपामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना गमावले आहे. दुर्घटनेची माहिती नातेवाइकांना देताना त्यांच्या डोळ्यातून पाणी थांबत नाहीये. येथे लोकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आम्हाला रुग्णवाहिकांची नितांत गरज आहे. लोकांना अन्न आणि तंबूंची गरज आहे. कृपया आम्हाला वाचवा, असे आवाहन स्थानिक नागरिक करत आहेत.
म्हणे... जगाचा शेवट होत आहे...- भूकंप केंद्राच्या सुमारे ४५ किलोमीटर ईशान्येकडील भागात अनेक नागरिक मातीच्या विटांपासून बनवलेल्या घरांमध्ये राहतात. - आता येथील अनेक घरे कोसळली असून, केवळ पडलेले मोठमोठे ढिगारे दिसत आहेत. आम्हाला एक मोठा हादरा जाणवला, जणूकाही हा जगाचा शेवट आहे असे वाटते. - केवळ १० सेकंदात आमचे सर्व होत्याचे नव्हते झाले, असे स्थानिक रहिवासी अयुब यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार -नोरा फतेहीभूकंपग्रस्त मोरोक्कोला मदत दिल्याबद्दल अभिनेत्री नोरा फतेहीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे आभार मानले आहेत. नोरा ही मोरोक्कन वंशाची कॅनेडियन कलाकार आहे. या कठीण काळात मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत भारत करत आहे. या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार! मदतीचा हात पुढे करणाऱ्या पहिल्या देशांमध्ये तुम्ही होता. मोरोक्कन लोक आपले खूप आभारी आणि कृतज्ञ आहेत! जय हिंद, असे तिने म्हटले.