ऑनलाइन लोकमत
तैपेई, दि. ६ - दक्षिण तैवानच्या तैनान शहराजवळ शनिवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले असून या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. भूकंपाच्या धक्क्यामुळे इमारत कोसळून काही नागरिक मृत्यूमुखी पडले तर सुमारे २२१ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी मोजली गेली.
भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे चार वाजता हा धक्का बसला. तैनान शहरापासून ३६ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे रहिवासी इमारत कोसळली ५ जण ठार झाले. तर इतर नागरिकांना अग्निशमनदलाच्या जवानांनी बाहेर काढले. लष्कराचे जवानही मदतीला धावले असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
नेपाळ आणि बिहारलाही भूकंपाचे धक्के
नेपाळमध्येही शुक्रवारी रात्री काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची नोंद ५.५ इतकी नोंदविली गेली असून त्यात १५ जण जखमी झाले. दरम्यान, बिहारच्या उत्तर भागालाही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. राष्ट्रीय भूकंप केंद्राने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू काठमांडूच्या उत्तर पूर्व भागात ५५ कि.मी. अंतरावर सिंधूपालचौक जिल्ह्यात होता. पर्यटनस्थळ पोखरा येथेही धक्के जाणवले. भूकंपानंतर अनेक नागरिक घराबाहेर पळत होते. गतवर्षी २५ एप्रिलला नेपाळमध्ये ७.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले होते. काठमांडूपासून ५० कि.मी. अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपानंतर नेपाळमध्ये चार अथवा त्यापेक्षा अधिक तीव्रतेचे ४२८ धक्के जाणवले आहेत.