इंडोनेशियामध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.८ असल्याचे सांगण्यात येत आहे. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, भूकंप इंडोनेशियाच्या अंबोनच्या आग्नेय दिशेला सुमारे ३७० किलोमीटर अंतरावर होता. मात्र, त्सुनामी चेतावणी केंद्राने त्सुनामीचा इशारा दिलेला नाही.
याअगोदर गेल्या गुरुवारी इंडोनेशियातील तिमोरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ६ च्या वर मोजली गेली. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पृष्ठभागापासून सुमारे १० किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाच्या केंद्राजवळील भागात भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे धक्के जाणवले. तिमोर प्रदेश आणि तिमोर-लेस्टेमध्ये इतरत्र हलके धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
६ नोव्हेंबर रोजी नेपाळमध्येही भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. यावेळी दिल्ली-एनसीआरसह लखनौमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे.
सध्यातरी कुठेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. गेल्या शुक्रवारीच नेपाळमध्ये भूकंपाने मोठं नुकासान झालं होतं. यामध्ये जाजरकोटमधील ९०५ घरांचे पूर्णत: तर २७४५ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. रुकुम पश्चिम भागात भूकंपामुळे २१३६ घरांचे पूर्ण नुकसान झाले, २६४२ घरांचे अंशत: नुकसान झाले आणि ४६७० घरांचे माफक प्रमाणात नुकसान झाले.