नववर्षाच्या सुरुवातीलाच जपानभूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले असून, या भूकंपाच्या धक्क्यांनंतर मोठ्या लाटा उसळल्याने त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. पश्चिम जपानमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता ७.४ मॅग्निट्युट एवढी नोंदवली गेली आहे. या भूकंपानंतर त्सुनामी येण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे.
जपानमधील हवामान संस्थेने सांगितले की, इशिकावा आणि जवळचा परिसर भूकंपाच्या या तीव्र धक्क्यांनी हादरला आहे. तसेच या भूकंपाची तीव्रता ७.४ मॅग्निट्युट इतकी असल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. त्सुनामीमुळे ५ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी किनारी भाग सोडून इमारतींच्या वरच्या भागात किंवा उंच ठिकाणी आश्रय घ्यावा. असं आवाहन जपानमधील सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या एनएचकेवरून करण्यात आलं आहे.
शेकडो बेटांवर वसलेल्या जपानचा संपूर्ण भाग हा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. तसेच येथील महासागरामध्ये होणाऱ्या भूकंपांमुळे येथील किनाऱ्यांवर त्सुनामीच्या लाटाही धडकत असतात. दरम्यान, २०११ मध्ये मार्च महिन्यात आलेल्या त्सुनामीमुळे जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली होती. तसेच त्सुनामीमुळे फुकुशिमा अणुऊर्जा केंद्रात पाणी शिरून किरणोत्साराचा धोका निर्माण झाला होता.