भारत, पाकिस्तान, चीनसह ८ देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तानच्या हिंदूकुश भागात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाची तीव्रता ६.३ इतकी सांगण्यात येत आहे. भारतातील पंजाब, जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भारतातील राज्यांमध्ये ५.६ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. आसपासच्या देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ताजिकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.१९ च्या सुमारास, फैजाबाद, अफगाणिस्तानच्या पूर्व-दक्षिणपूर्वेला ७० किमी अंतरावर ५.९ तीव्रतेचा हादरा जाणवला. तुर्कस्तानमधील कहरामनमारासच्या दक्षिणेस २४ किमी अंतरावर ३.६ रिश्टर स्केलचा भूकंपही जाणवला. त्याचबरोबर पाकिस्तानच्या इस्लामाबाद, खैबर पख्तुनख्वा, पंजाब आणि पाकिस्तानच्या इतर प्रांतांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
सीरियाच्या सीमेवर तुर्कस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात ७.७ आणि ७.६ तीव्रतेच्या भूकंपांनी संपूर्ण देश हादरला. त्यामुळे तुर्कियेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू गॅझियानटेपच्या पश्चिम-वायव्येस ३७ किमी अंतरावर होता. भयंकर भूकंपात एकट्या तुर्कीमध्ये सुमारे ६० हजार लोकांचा मृत्यू झाला. भूकंपाच्या धक्क्यांमुळे तुर्कीचा हा भाग ८० सेकंदांपर्यंत हादरत राहिला. पत्त्याच्या घराप्रमाणे इमारती कोसळल्या होत्या. या भूकंपामुळे तुर्कीचे ११८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. तुर्कीमध्ये फेब्रुवारी महिन्यात झालेल्या भूकंपामुळे शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नेपाळमध्ये ५.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. भारतातील अनेक राज्यांमध्ये त्याचे धक्के जाणवले. ९ नोव्हेंबर रोजी डोटी जिल्ह्यात भूकंपामुळे ६ जणांना जीव गमवावा लागला होता. यापूर्वी २०१५ च्या भूकंपात नेपाळमध्ये ९००० लोकांचा मृत्यू झाला होता.