कोनाक्री - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. जगातील अनेक देश कोरोनाचा संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी संकट आलं आहे. कोरोनानंतर इबोला व्हायरसने (Ebola Virus) थैमान घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटात आफ्रिकेमधील गिनी देशामध्ये इबोलाचा कहर पाहायला मिळत आहे. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा इबोलाचा प्रसार झाला असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच चार जणांना संसर्ग झाला असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इबोलाचा वाढता धोका पाहता गिनी देशातील सरकारने इबोला संसर्गाला महामारी घोषित केलं आहे. गोउइके येथील एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमानंतर सात लोकांना डायरिया, उलट्या आणि रक्तस्त्राव होण्याचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर गोउइके लायबेरिया सीमेजवळच्या भागातील लोकांचे तातडीने विलगीकरण करण्यात आलं. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. मंत्रालयाने इबोलला महामारी जाहीर केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादी साथ रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जातात ती सर्व तयारी गिनी सरकारने केली आहे.
देशाचे आरोग्यमंत्री रेमी लामाह यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना इबोलामुळे चार मृत्यू झाल्याने चिंता वाटत असल्याचं म्हटलं आहे. गिनीमध्ये 2013-2016 दरम्यान इबोला व्हायरसचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाला होता. या व्हायरसचा प्रसार झाल्याने आतापर्यंत पश्चिम आफ्रिकेमध्ये 11300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू हे गिनी, लायबेरिया आणि रियरा लिओनमध्ये झाले आहेत. इबोला झाल्याची शक्यता असणाऱ्या रुग्णांची दोन वेळा चाचणी करण्यात आली आहे. या लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण करण्याचं काम आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केलं जात आहे.
गेल्या सात दिवसांमध्ये चार जणांना इबोलाचा संसर्ग
गिनीप्रमाणेच डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशामध्येही इबोला व्हायरसचा वेगाने संसर्ग होत आहे. गेल्या सात दिवसांमध्ये पश्चिम किवु प्रांतामध्ये चार जणांना इबोलाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक आरोग्यमंत्री यूजीन नाजानू सलिता यांनी या प्रांतात सर्वात आधी सात फेब्रुवारी रोजी इबोलाचा रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली आहे. काँगोमधील इक्वाटोर प्रांतात 2018 मध्ये इबोलाचा विस्फोट झाला होता. या ठिकाणी एकाच वेळी 54 रुग्ण आढळून आले होते. यापैकी 33 जणांचा मृत्यू झाला होता.