जे पेराल, तेच उगवतं हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जर प्रेम केलं, दुसऱ्याला प्रेम दिलं, तर त्या बदल्यात तोही तुमच्या प्रेमाची दामदुपटीनं परतफेड करेल. तुम्ही जर एखाद्याचा सतत तिरस्कार केला, द्वेष केला, तर तुम्हालाही तेच मिळण्याची शक्यता जास्त. प्राणी आणि माणसांच्या बाबतीतही हे खरं आहे. त्यांच्या दोस्तीच्या अनोख्या कहाण्या आपण आजवर अनेकदा ऐकल्या आहेत. याच यादीत आणखी एका अफलातून दोस्तीची कहाणी सामील झाली आहे. ही कहाणी आहे तुर्कीचा एक गरीब मच्छिमार आणि राजबिंड्या सारस पक्षाच्या दोस्तीची!
तेरा वर्षांपूर्वीची गोष्ट. तुर्कीमधील बर्सा या शहराजवळील एस्किकारागाक हे एक छोटंसं गाव. एडेम यिलमाज हा तिथला एक गरीब, वृद्ध मच्छिमार. गावात एक छोटासा तलाव आहे. या तलावातले मासे पकडायचे, ते विकायचे आणि आपला उदरनिर्वाह चालवायचा, हे त्याचं रोजचं काम.
त्यादिवशी तो आपल्या बोटीत बसून तलावात मासेमारी करीत होता. तेवढ्यात त्याच्या पाठीमागून आवाज आला. त्यानं मागे वळून पाहिलं तर त्याच्या वल्ह्याच्या टोकावर एक राजबिंडा, रुबाबदार पक्षी बसलेला होता. तोच एडेमला ‘हाका’ मारत होता. हा होता सारस पक्षी. विणीच्या हंगामात दरवर्षी ते अक्षरश: हजारो किलोमीटरचा प्रवास करतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच ठिकाणी येतात. माणसांच्या वस्तीजवळ ते राहत असले तरी माणसांच्या इतक्या जवळ ते कधीच येत नाहीत. हा सारस पक्षी आपल्या इतक्या जवळ आलेला, आपल्या शेजारी बसलेला पाहून एडेम यांनाही आश्चर्य वाटलं. त्याला भूक लागली असेल असं वाटून त्यांनी त्याच्या दिशेनं हवेत एक मासा उडवला. त्यानं तो हवेतच झेलला. त्यानंतर दुसरा, तिसरा.. असे अनेक मासे एडेम यांनी त्याच्या दिशेनं भिरकावले. पोट भरल्यावर तो उडून गेला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या वर्षीही हा सारस पक्षी पुन्हा एडेम यांच्याकडे, ते तलावात मासेमारी करीत असताना आला. यावेळीही त्यांनी त्याला तसेच मासे भरवले आणि त्यानं ते हवेतल्या हवेत गट्टम केले. यानंतर मात्र त्यांचा याराना वाढला आणि दरवर्षी हा सारस पक्षी त्यांच्या भेटीला येऊ लागला. पुढच्या वर्षी तो येतो की नाही, म्हणून तो गेल्यानंतर दरवर्षी एडेम यांना हुरहुर लागून राहायची, पण या सारस पक्ष्यानं आपल्या यारी-दोस्तीचा सिलसिला सोडला नाही आणि आपल्या ज्येष्ठ मित्राला नाराजही केलं नाही.
यंदा हे तेरावं वर्ष आहे. तो सलग एडेम यांच्याकडे पाहुणचाराला येतो आहे आणि एडेमही त्याचं अगदी मनापासून आगतस्वागत करताहेत. आपली परिस्थिती कशीही असली तरी त्यांनी त्याचा ‘पंचपक्वान्ना’चा पाहुणचार कधी चुकवला नाही.
तुर्कीमध्ये सारस पक्षाला ‘यारेन’ असं म्हटलं जातं. ‘यारेन’ या शब्दाचा अर्थही साथी, सोबती, सखा असाच आहे. दरवर्षी वसंत ऋतूत यारेन पुन्हा इथे परत येतो आणि एडेन यांच्या घराला, त्यांच्या मनाला पालवी फुटते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यारेन आला की दरवर्षी त्याची ‘मैत्रीण’ नाजली हीदेखील येते. या कुटुंबाचं घरटंही एडेम यांच्या घराजवळच आहे. या दोघांचा पाहुणचार करताना दिवस कसे सरतात आणि त्यांची जाण्याची वेळ कधी येते हे एडेम यांनाही समजत नाही.
गेली १३ वर्षे हे न चुकता सुरू आहे. दरवर्षी हे जोडपं त्यांच्याकडे येतं, त्याच घरट्यात ते राहतात, आपला संसार करतात, एडेम यांचा पाहुणचार स्वीकारतात आणि हजारो किलोमीटर दूर निघून जातात, ते पुन्हा परत येऊ हे आश्वासन देऊनच!
सुरुवातीला गावकऱ्यांनी एडेम यांना वेड्यात काढलं, आपले मासे आणि वेळ ते फुकट घालवताहेत म्हणून! पण एडेम यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. यारेन आणि एडेम यांच्या दोस्तीच्या पाचव्या वर्षी मात्र आल्पर टाइड्स या वाइल्डलाइफ फोटोग्राफरनं त्यांची कहाणी चित्रबद्ध केली आणि त्यानंतर ती सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र दोघेही सेलिब्रिटी बनले आणि जगभरात त्यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड वाढली.
मरते दम तक नहीं टुटेंगी ये दोस्ती!२०१९ मध्ये या अनोख्या दोस्तीच्या कहाणीवर एक डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली. २०२० च्या प्राग फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री म्हणून ती गौरवली गेली. याच कहाणीवर आता एक शॉर्ट फिल्मही येऊ घातली आहे. एडेम यांचं गावही या दोस्तीमुळे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येतंय. त्यांच्या दोस्तीचं शिल्प गावात उभारण्यात आलंय. यारेन आता साधारण १७ वर्षांचा आहे, तर एडेम ७० वर्षांचे. सारसचं आयुष्य साधारण तीस वर्षे असतं. म्हणजे दोघांकडेही आता आयुष्याचे साधारण तेवढेच दिवस उरले आहेत. एडेम म्हणतात, आमची दोस्ती मरेपर्यंत तुटणार नाही!