मेलबर्न- ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरामध्ये राहाणाऱ्या मूळच्या केरळच्या असणाऱ्या सॅम अब्राहम यांची दोन वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन कोर्टाने त्याची पत्नी आणि प्रियकराला कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हे दोघेही मूळचे केरळचेच आहेत.
सॅम अब्राहम या 32 वर्षिय युवकाचा मृतदेह त्याच्या मेलबर्न येथील घरामध्ये 13 ऑक्टोबर 2015 रोजी सापडला होता. तपास सुरु झाल्यावर पहिल्या टप्प्यात त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याच्या सायनाईडद्वारे विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट झाले. त्याची हत्या केल्याबद्दल पत्नी सोफिया व तिचा प्रियकर अरुण कमलासनम यांना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांना 20 वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. सोफिया 33 वर्षांची असून तिचा प्रियकर 35 वर्षांचा आहे. सोफियाला 22 वर्षांची तर अरुणला 27 वर्षांची कारावासाची शिक्षा झाली आहे.अरुणने सोफिया, सॅम आणि त्यांच्या 6 वर्षांच्या मुलाला गुंगीचे औषध देऊन सॅमला सायनाईड घातलेला ऑरेंज ज्यूस प्यायला दिला होता.सुरुवातीला अरुण आणि सोफिया यांच्यावर पोलिसांना संशय आला नाही. मात्र ते दोघे सतत भेटत असल्याचे आणि एकमेकांसोबत काळ घालवत असल्याचे गुप्त पोलिसांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे त्या दोघांनी बँकेत संयुक्त खाते सुरु काढल्याचेही त्यांना समजले. त्यानंतर अरुणवरील प्रेमाबद्दल लिहिलेला मजकूर तिच्या डायरीत सापडल्यावर पोलिसांनी तपासाची सूत्रे या दोघांच्या दिशेऩे फिरवली. शिक्षा भोगून झाल्यावर अरुणला पुन्हा भारतात पाठवले जाईल तर सोफिया ऑस्ट्रेलियन नागरिक असल्यामुळे तिच्याबद्दल निर्णय झालेला नाही. तपासामध्ये त्याआधीही एकदा सॅमला मारण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांना समजले.