युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न, पण पुतिन यांच्याकडून भेटीसाठी प्रतिसाद नाही; पोप फ्रान्सिस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 12:27 PM2022-05-04T12:27:37+5:302022-05-04T12:27:44+5:30
'युद्ध थांबले नाही तर पूर्वेकडे नाटोच्या विस्ताराला चिथावणी मिळेल'
व्हॅटिकन सिटी :रशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेले युद्ध थांबवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेण्यास मॉस्कोला येण्याची तयारी मी दाखवली होती; परंतु त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही, असे पोप फ्रान्सिस यांनी इटालियन वृत्तपत्र ‘कॉरिएर डेल्ला सेरा’शी बोलताना म्हटले. हे युद्ध थांबले नाही तर पूर्वेकडे नाटोच्या विस्ताराला चिथावणी मिळेल, असेही त्यांनी सूचवले होते.
फ्रान्सिस म्हणाले, ‘तीन आठवड्यांपूर्वी मी भेटीची तयारी व्हॅटिकनचे सेक्रेटरी ऑफ स्टेट कार्डिनल पिएट्रो पॅरोलीन यांच्यामार्फत दाखवली होती. रशियन ऑर्थोडोक्स चर्चशी संबंध चांगले राखण्यासाठी प्रदीर्घ काळपासून सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोप्सनी मॉस्कोला भेट देण्यासाठी अनेक दशके प्रयत्न केले आहेत व ही भेटही त्याचाच एक भाग होती. चर्चशी हे संबंध एक हजारपेक्षा जास्त वर्षांपासून फाटलेले आहेत; परंतु त्यांना कधीच प्रतिसाद मिळालेला नाही.’
‘रशियाच्या नेत्याने संधीसाठी एखादी खिडकी उघडी ठेवणे आवश्यक आहे, यात शंका नाही; परंतु आम्हाला अजूनही प्रतिसाद मिळालेला नाही. व्लादिमिर पुतिन यांना याक्षणी ही बैठक नको आहे आणि ते घेऊही शकणार नाहीत, अशी भीती मला वाटते. तरीही आम्ही प्रयत्न करीत आहोत,’ असे फ्रान्सिस म्हणाल्याचे वृत्तात म्हटले.