ऑनलाइन लोकमत
कैरो, दि. २४ - इजिप्त एअरच्या MS804 विमान दुर्घटनेत सापडलेल्या मानवी अवशेषांवरुन घातपात झाल्याची शक्यता इजिप्तच्या फॉरेन्सिक तज्ञांनी व्यक्त केली आहे. विमान उड्डाणवस्थेत असताना झालेल्या स्फोटामुळे विमान खाली कोसळले असा निष्कर्ष इजिप्तच्या फॉरेन्सिक तज्ञांनी काढला आहे. मागच्या गुरुवारी पॅरिसहून कैरोला निघालेले हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानात ६६ प्रवासी होते. सर्वांचा मृत्यू झाला आहे.
इजिप्तशियन तपास पथकातील अधिका-यांनी कैरो येथील शवागरात जाऊन मृतदेहांची पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष काढला. आतापर्यंत मानवी शरीराचे ८० तुकडे कैरोला आणण्यात आले आहेत. या तुकडयांमध्ये शरीराचा एकही अवयव पूर्णावस्थेत नाही. स्फोट नेमका कशामुळे झाला ते सांगता येणार नाही असे अधिका-याने सांगितले.
तांत्रिक बिघाडापेक्षा दहशतवादी हल्ल्याची शक्यता जास्त असल्याचे इजिप्तच्या तपास अधिका-यांचे मत आहे. अल-वतन या कैरोच्या वर्तमानपत्राने विमान उड्डाणावस्थेत असताना स्फोटामध्ये उडवून दिल्याचे अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. आतापर्यंत जे मानवी अवशेष सापडले आहेत ते हातापेक्षा मोठे नसल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.
पॅरिसहून कैरोला निघालेलं हे विमान दुपारी २.४५ वाजता रडारवरुन गायब झाले होते. रडारशी संपर्क तुटला तेव्हा हे विमान ३७ हजार फूट उंचीवर होते.