गिझा - कैरो येथील गिझा पिरॅमिडजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामध्ये व्हियतनामचे तीन पर्यटक आणि त्यांच्या गाईडचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर इजिप्त पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवाईला सुरुवात केली असून यामध्ये 40 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गिझा प्रशासकीय हद्दीत आणि उत्तर सिनाई द्वीपकल्पात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात हे संशयित मारले गेले असे माहिती अंतर्गत मंत्रालयाने दिली आहे.
सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, संशयित देशाविरुद्ध, तसेच पर्यटक संस्था आणि चर्चवर अनेक हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर विविध ठिकाणी छापे टाकले. गिझामध्ये टाकलेल्या छाप्यात पहिल्या ठिकाणी 14 तर दुसऱ्या ठिकाणी 16 जण ठार झाले. शस्त्रास्त्रे, दारुगोळा, बॉम्ब बनविण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणावर सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.