कीव्ह :रशियातील तातारस्तान भागातील कझान शहरावर युक्रेनने शनिवारी सकाळी अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्याप्रमाणेच आठ ड्रोनहल्ले केले. त्यात सहा निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले. रशिया-युक्रेन सीमेपासून हे शहर शेकडो किलोमीटर दूर आहे. या हल्ल्यात किती जीवितहानी झाली किंवा किती जण जखमी झाले याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.
तातारस्तानचे गव्हर्नर रुस्तम मिनिखानोव्ह यांनी सांगितले की, युक्रेनच्या आठपैकी सहा ड्रोननी निवासी इमारतींवर, एका ड्रोनने औद्योगिक संकुलावर हल्ला केला तर एक ड्रोन पाडण्यात यश आले. कझान शहरातील गगनचुंबी इमारतीवर ड्रोनने हल्ला केल्याची व्हिडीओफीत समाजमाध्यमांत प्रसारित झाली आहे.
या हल्ल्यानंतर कझान विमानतळावरील हवाई वाहतूक काही काळ रोखण्यात आली. तसेच या शहरातील सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)
अद्याप जबाबदारी स्वीकारलेली नाही
या हल्ल्यांची जबाबदारी युक्रेनने अद्याप स्वीकारलेली नाही. शुक्रवारी त्या देशाने रशियातील कुस्र्क सीमाभागातील प्रदेशावर हल्ले केले होते. त्यासाठी अमेरिकी बनावटीच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला.
त्यामध्ये एका बालकासह सहा जणांचा मृत्यू झाला. रशियाने शुक्रवारी मध्यरात्री युक्रेनवर ११३ ड्रोनच्या साहाय्याने हल्ले केले होते. त्यातील ५७ ड्रोन युक्रेनने पाडले. ५६ ड्रोन बेपत्ता आहेत. इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा वापर करून या ड्रोनची प्रणाली युक्रेनने बंद पाडली असण्याची शक्यता आहे.
या ड्रोन हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल झाले आहेत. याआधी शुक्रवारीही यूक्रेनने रशियातील कुस्र्क सीमेवर जोरदार क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. या हल्ल्यासाठी अमेरिकी क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. यात सहा जण मारले गेले होते.