सिडनी : नैऋत्य प्रशांत महासागरात वव्हंशी पाण्याखाली बुडालेल्या अवस्थेत असलेल्या ‘झीलंडिया’ या पृथ्वीवरील नव्या आणि आठव्या खंडाचा शोध लावल्याचा दावा न्यूझीलंडमधील भूवैज्ञानिकांनी केला आहे.‘जिआॅलॉजिकल सोसायटी आॅफ अमेरिका’च्या जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘झीलंडिया: पृथ्वीवरील दडलेला खंड’ या शोधनिबंधात हे वैज्ञानिक लिहितात की, सुमारे ४.५ दशलक्ष चौ. किमी एवढे क्षेत्रफळ असलेल्या या खंडाचा ९४ टक्के भाग पाण्याखाली बुडालेला आहे. वस्तुत: न्यूझीलंड आणि न्यू कॅलडिओनिया ही बेटे याच अदृश्य खंडाचा भाग असून, या खंडाच्या भूप्रदेशावरील ते सर्वात उंच भाग असल्याने ही बेटे पाण्याबाहेर दिसू शकतात, असाही त्यांचा दावा आहे.ड्यूनेडिन, न्यूझीलंड येथील जीएनएस सायन्स या संशोधन संस्थेतील एक भूवैज्ञानिक निक मॉर्टिमर हे हा शोधनिबंध लिहिणाऱ्या वैज्ञानिकांचे प्रमुख आहेत. ते म्हणाले की, ‘झीलंडिया’ हा स्वतंत्र खंड असल्याचे सबळ वैज्ञानिक पुरावे मिळाले आहेत, पण ते जगापुढे मांडण्यात अथांग महासागर ही मोठी अडचण आहे. हा सागर जर हटविता आला तर समुद्राच्या तळापासून बराच वर आलेला व उंच पर्वतांच्या रांगा असलेला आम्ही म्हणतो तो स्वतंत्र खंडप्राय भूप्रदेश कोणालाही सहज दिसू शकेल!पृथ्वीवर आणखी एक खंड असावा, असा कयास वैज्ञानिक कित्येक वर्षांपासून करत आले आहेत. या नवा शोध मान्य झाला तर त्यावर शिक्कामोर्तब होईल. मॉर्टिमर म्हणाले, ‘सुमारे १९२०च्या दशकापासून भूगर्भविज्ञानाशी संबंधित लिखाणांत न्यूझीलंड, कॅथम बेटे व न्यू कॅलेडोनिया इत्यादी भूभागांचे वर्णन करताना ‘खंडीय’ असा शब्दप्रयोग केला गेला आहे. (वृत्तसंस्था)स्वतंत्र खंडांचे निकषसमुद्राच्या तळापेक्षा उंच असा भूप्रदेश, वैशिष्ट्यपूर्ण भूरचना आणि सागरतळाहून अधिक कडक असे भूआवरण हे स्वतंत्र खंडाचे व्यवच्छेदक निकष मानले जातात. ‘झीलंडिया’ला हे सर्व निकष लागू पडतात, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
प्रशांत महासागरात आठव्या खंडाचा शोध
By admin | Published: February 19, 2017 2:14 AM