लॅटिन अमेरिकन देश एल साल्वाडोरमध्ये (El Salvador) 33 खून, 9 खून करण्याचा कट आणि इतर अनेक गुन्हेगारी कारवायांसाठी दोषी ठरलेल्या एका आरोपीला 1310 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विल्मर सेगोविया नावाचा हा गुंड MS-13 टोळीचा सदस्य होता. अल साल्वाडोरमध्ये राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांनी स्वत: गुंडांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे.
देश गुन्हेगारीमुक्त करण्याचा राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांचा प्रयत्न आहे. या दिशेने 33 खून आणि नऊ खूनांचा कट रचणाऱ्या या गुंडाला 1310 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच 22 हत्यांप्रकरणी दोषी असलेल्या आणखी एका गुंडाला 945 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मिगेलवर खुनाचा प्रयत्न, जाळपोळ आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. एल साल्वाडोरमध्ये आतापर्यंतची सर्वात कठोर शिक्षा म्हणून या शिक्षांचे वर्णन केले जात आहे.
एल साल्वाडोरमधील या कठोर शिक्षा देशाचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांच्या प्रयत्नांचे परिणाम आहेत. त्यांनी देशात फोफावत असलेल्या या टोळ्यांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. देशातील कारागृहात अनेक खतरनाक गुंड कैद आहेत. काही दिवसांपूर्वी सरकारने हजारो गुंडांना मेगा जेलमध्ये हलवले होते. याबाबतची माहिती खुद्द राष्ट्राध्यक्षांनी ट्विट करून दिली आहे.
राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांनी 24 फेब्रुवारीला ट्विट केले होते की, आज आम्ही 2000 गुंडांना स्थलांतरित केले आहे. त्यांना नवीन मेगा जेलमध्ये ठेवण्यात आले आहे, जेथे ते अनेक दशके सीमा भिंतीच्या आत राहतील आणि सामान्य माणसांना त्रास देऊ शकणार नाहीत. या मेगा जेलमध्ये सुमारे 2000 गुंडांना हलवण्यात आले आहे. हे तुरुंग अमेरिकेतील सर्वात मोठे तुरुंग मानले जाते, ज्यात 40,000 कैदी ठेवण्याची क्षमता आहे.