लोक लग्न करतात, त्यानंतर मुलं होतात आणि मग त्या मुलांचं संगोपन करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य घालवतात. पण ही मुलं म्हातारपणी आई-वडिलांना आधार देतीलच याची शाश्वती नसते. जेव्हा अशा लोकांचा त्यांच्याच मुलांकडून विश्वासघात होतो तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो. कारण त्यांनी आपल्या मुलांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेलं असतं.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका वृद्ध जोडप्याला त्यांच्या मुलाने घरातून हाकलून दिलं आहे. हे दोघं 20 वर्षांपासून या घराचे EMI भरत होते. इस्माइल आणि एंजेलिता रामिरेज यांनी अलीकडेच फॉक्स26 न्यूजला सांगितलं की, त्यांनी 2003 मध्ये घर विकत घेतलं होतं. मुलाने तेव्हा सांगितलं की, पेपरमध्ये नाव टाकण्याची गरज नाही.
मुलगा दोघांशी खोटं बोलला. जोडप्याला इंग्रजी येत नाही, त्यांना स्पॅनिश येतं, त्यामुळे त्यांना पेपरही वाचता येत नव्हता. आता त्यांना नोटीस मिळाली आहे की त्यांना घर रिकामं करावे लागेल कारण त्याच्या मालकाला ते घर विकायच आहे. त्या घराचा मालक हा दुसरा कोणी नसून त्या जोडप्याचाच मुलगा होता आणि मुलाने हे घर विकलं होतं.
जोडप्याने कायदेशीर मदत घेण्याचा प्रयत्न केला मात्र वकिलांनी केस घेण्यास नकार दिला. कारण घर मुलाच्या नावावर होते. जोडपं सांगतं की, हे आमचं घर आहे हे मुलाला माहीत होतं. त्यामुळे तो असं करेल असा आम्ही विचारही कधी केला नाही. नवीन घर घेण्यासाठी आता पैसे नाहीत. तसेच भाड्याने देखील घर घेऊ शकत नाही. सध्या मुलीकडे राहावं लागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.