देशात पाच राज्यांच्या निवडणुका असून नेदरलँडच्या निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. त्या देशाच्या एक्झिट पोलमध्ये कट्टर उजव्या विचारसरणीचे नेते गीर्ट वाइल्डर्स यांच्या पक्षाने विजय मिळवला आहे. गीर्ट यांच्या फ्रीडम पार्टीला ३७ जागा मिळाल्या आहेत. तर विरोधकांना २५ जागा मिळाल्या आहेत. आधी हा फरक केवळ २ जागांचाच असायचा यामुळे हा विजय खूप महत्वाचा मानला जात आहे.
हा एक्झिट पोल असला तरी गीर्ट सत्तेत आले तर युरोपमध्ये हा वेगळाच ट्रेंड सुरु होण्याची शक्यता आहे. गीर्ट यांना इस्लामविरोधी कठोर भूमिका घेणारा नेता म्हणून ओळखले जाते. भारतात जेव्हा नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर टिप्पणी केली होती, तेव्हा मोठा वाद झाला होता. तेव्हा गीर्ट यांनी त्याचे उघडपणे समर्थन केले होते.
जेव्हा अरब देश नुपूर शर्मा आणि भारताच्या विरोधात होते तेव्हा गीर्ट वाइल्डर्सने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचा बचाव केला होता. नेदरलँडलाही स्थलांतरितांचा मोठा प्रश्न सतावत आहे. त्यांचा लोंढा थोपविण्याची शपथ गीर्ट यांनी घेतली होती, त्याचा फायदा त्यांना झाल्याचे दिसत आहे. पीएम मार्क रुटे यांचा पक्ष 23 जागांसह तिसऱ्या स्थानावर आहे. जुलैमध्ये त्यांचे युतीचे सरकार पडल्यानंतर ही निवडणूक झाली आहे.
नुपूर शर्मा प्रकरणात अरब देश भारताला विरोध करत असताना वाइल्डर्सने या देशांना धारेवर धरले होते. भारताबद्दल किंवा इतर कोणत्याही देशाबद्दल तुम्हाला काय वाटते हे ठरविण्यापूर्वी स्वतःला आरशात पहा. हे देश भारतावर हल्ले करत आहेत, जे शरिया कायद्याला लोकशाही आणि मानवी हक्कांपेक्षा वरचे स्थान देतात. हे देश सर्वात असहिष्णु आहेत, असा आरोप गीर्ट यांनी केला होता.