रियाध : डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाच्या पोटातून विजेचा बल्ब बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. सौदी अरेबियात ही घटना घडली. हा बल्ब त्याने ११ वर्षांपूर्वी गिळला होता. २१ वर्षांचा तरुण अनेक दिवसांपासून आजारी होता. प्रकृती गंभीर बनल्यामुळे उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्याचे अहवाल पाहिल्यानंतर डॉक्टर आश्चर्यचकित झाले. प्रकृती गंभीर असल्यामुळे रुग्णाला तात्काळ आपत्कालीन कक्षात नेण्यात आले. त्याच्या पोटात विजेचा बल्ब होता, असे डॉक्टरांनी सांगितले. या बल्बमुळे त्याची प्रकृती गंभीर बनली होती. दीड तासाच्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पोटातून बल्ब बाहेर काढण्यात आला. त्याची प्रकृती आता ठीक आहे. दहा वर्षांचा असताना मी खेळता-खेळता बल्ब गिळला होता, असे या रुग्णाने सांगितले. तेव्हापासून हा बल्ब त्याच्या पोटात होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, रुग्णाची प्रकृती सुधारत आहे, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
रुग्णाच्या पोटात विद्युत बल्ब
By admin | Published: April 27, 2017 1:02 AM