इस्रायल आणि हमासमधील युद्धाची बातमी आली नाही असा एकही दिवस जात नाही. संपूर्ण गाझा पट्टी या युद्धाने धुमसते आहे. अनेक घरं बेचिराख झाली आहेत. माणसं बेघर झाली आहेत. मुलं पोरकी झाली आहेत. दोन महिने उलटून गेल्यानंतरसुद्धा हे युद्ध थांबण्याचं कुठलंही चिन्ह दिसत नाहीये. कुठल्याही आंतरराष्ट्रीय युद्धप्रमाणे इस्रायल आणि हमास हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. एरवी ज्यांचं सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा जवळजवळ अभेद्य समजलं जाते त्या इस्रायलला अजूनही हे युद्ध जिंकता आलेलं नाही. इतकंच नाही, तर हमासने ऑक्टोबरपासून ओलिस ठेवलेल्या सर्व नागरिकांची सुटकाही करता आलेली नाही.
जेव्हा जेव्हा इस्रायल गाझा पट्टीवर बॉम्बवर्षाव करतं तेव्हा तेव्हा त्यांच्यावर असा आरोप केला जातो की ते शाळा, इस्पितळं आणि इतर नागरी भागात बॉम्ब टाकून निरपराध लोकांचे बळी घेतायत. इस्रायलची त्याबद्दलची भूमिका अशी आहे, की हमासच्या अतिरेक्यांनी संपूर्ण गाझा पट्टीत भुयारी मार्गांचं जाळं तयार केलेलं आहे. जिथे तुम्हाला वर शाळा दिसते त्याच्याच खाली हमासच्या अतिरेक्यांचा तळ असतो.अर्थात जमिनीखाली अतिरेकी लपून बसलेले आहेत म्हणून जमिनीच्या वर असणारे गाझाचे निरपराध नागरिक मारून टाकायचे ही नीती योग्यही नाही आणि तसे करता येणार नाही हे तर उघडच आहे. पण जमिनीवरून किंवा आकाशातून हल्ले करता येत नसले तरीही जमिनीखाली लपलेल्या अतिरेक्यांचा नायनाट करणं इस्रायलला भाग आहे. आणि ज्यावेळी एखादा नवीन प्रश्न समोर येतो त्यावेळी त्याचं काहीतरी नवीनच उत्तर शोधावं लागतं, या न्यायाने इस्रायलने या अतिरेक्यांशी दोन हात करण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे. गाझा पट्टीतील हमासची सगळी भुयारं समुद्राच्या पाण्याने ते भरून टाकणार आहेत आणि भुयारातच त्यांचा ते खात्मा करणार आहेत.
गाझा पट्टी भूमध्य समुद्राला लागून आहे. इस्रायलने नोव्हेंबर महिन्यात गाझा शहरातील अल-शाती निर्वासित छावणीच्या जवळ पाच प्रचंड मोठे पाणी उपसणारे पंप लावले आहेत. हे पंप जर पूर्ण क्षमतेने चालवले तर हजारो घनफूट पाणी उपसून ते गाझामधील भुयारी मार्ग समुद्राच्या पाण्याने भरून टाकू शकतात. इजिप्तच्या सैन्याने गाझा पट्टीत हा प्रयोग २०१५ साली केला होता. गाझा पट्टीच्या दक्षिण सीमेकडेदेखील अशी भुयारं तयार केलेली आहेत. ही भुयारं २०१५ साली स्मगलिंग करण्यासाठी वापरली जात. त्यावेळी इजिप्तच्या सैन्याने ती भुयारं पाण्याने भरून टाकली होती. पण अतिरेक्यांशी युद्ध करण्यासाठी भुयारात पाणी भरायचं हे याआधी कोणी केलेलं नाही.
अर्थात इस्रायलनेदेखील या प्रयोगाची पूर्ण तयारी केलेली असली तरी ती कृती प्रत्यक्षात आणायचा की नाही याबद्दलचा निर्णय त्यांनी अजून घेतलेला नाही. इजिप्तने जे केलं त्यापेक्षा इस्रायल वेगळं तंत्रज्ञान आणि वेगळी पद्धत वापरेल हेही शक्य आहे. त्याशिवाय एवढं करून त्याचा उपयोग होईल का हेही सांगता येत नाही. कारण अतिरेक्यांनी नेमकं किती भुयारांचं जाळं विणलं आहे, ते कुठून कुठे कसं आहे, याबद्दलची पूर्ण माहिती अजूनही कोणालाही मिळालेली नाही. मात्र इस्रायलने जमिनीवर उतरून युद्ध करायला सुरुवात केल्यापासून त्यांना ८०० पेक्षा जास्त भुयारात जाणारे उभे बोगदे सापडलेले आहेत. त्यापैकी ५०० बोगदे इस्रायली सैन्याने नष्ट केले आहेत. पण जर का भुयारात उतरण्यासाठी ८०० हून अधिक बोगदे सापडले असतील, तर असे न सापडलेलेही अनेक बोगदे असतील आणि हे सगळे बोगदे एकमेकांना जोडणारं भुयारांचं प्रचंड जाळं असेल हेही उघडच आहे.
७ ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्यात १२०० हून अधिक नागरिक ठार झाले आणि हमासने जवळजवळ २४० लोकांना ओलीस ठेवलं तेव्हाच इस्रायलने काहीही करून हमासचा नायनाट करण्याची शपथ घेतली. हमासला नष्ट करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून इस्रायलने त्यांची भुयारं समुद्राच्या पाण्याने भरून टाकण्याचा प्लॅन केलेला आहे. या प्लॅनबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायात अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
सामान्यांचं मरण आणखी वेदनादायी?गाझाच्या भूगर्भात समुद्राचं पाणी भरल्याने तिथल्या जमिनीवर काय परिणाम होईल हे कोणालाही माहिती नाही. तिथली जमीन नापीक होईल का? हे पाणी तिथल्या विहिरींमध्ये झिरपलं किंवा पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळलं तर ते पाणी पिण्यायोग्य राहील का? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. आज गाझा पट्टीला अनेक प्रश्नांनी विळखा घातलेला आहे. त्या सगळ्यात तिथल्या सामान्य माणसांचं मरण होतंय. इस्रायलच्या या प्रयोगानं या माणसांचं मरण आणखी वेदनादायी होईल, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.