हिंमत असेल तर माझ्याशी दोन हात करा; एलाॅन मस्क यांचे थेट पुतीन यांना द्वंद्वयुद्धाचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 06:34 AM2022-03-15T06:34:04+5:302022-03-15T06:34:11+5:30
एलाॅन मस्क यांचे युक्रेनसाठी थेट पुतीन यांना द्वंद्वयुद्धाचे आव्हान
न्यूयॉर्क : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस तीव्र हाेत आहे. काेणीही माघार घेण्यास तयार नाही. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलाॅन मस्क यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना शिंगावर घेतले आहे. पुतीन यांना त्यांनी थेट द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले असून, डाव युक्रेनवर राहणार आहे, असे ट्वीट करून मस्क यांनी रणशिंग फुंकले.
रशिया-युक्रेनमध्ये १९ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. वाटाघाटीच्या चार फेऱ्यांनंतरही युद्ध थांबण्याची काेणतीही चिन्हे दिसत नाहीत. रशियाने वाटाघाटीसाेबतच युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्लेही तीव्र केले आहेत. त्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती बिकट हाेत आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक नागरिकांचा या युद्धात बळी गेला आहे. या कठीणप्रसंगी एलाॅन मस्क यांनी सातत्याने युक्रेनला पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी कायम पुतीन यांना जाहीरपणे विराेध केला आहे. आता तर त्यांनी पुतीन यांना थेट द्वंद्वयुद्धाचे आव्हान देऊन दंड थाेपटले आहेत.
मस्क यांचे ट्विट
मस्क यांनी रशियन भाषेचा वापर करून ट्वीट केले. त्यात त्यांनी लिहिले, की मी व्लादिमीर पुतीन यांना द्वंद्वयुद्धाचे आव्हान देताे. डाव युक्रेनवर आहे. तुम्ही या द्वंद्वासाठी तयार आहात का, असे आणखी एक ट्वीट करून त्यांनी त्यात रशियाच्या राष्ट्रपतींचे अधिकृत हँडलला टॅग केले आहे.
युक्रेनला अशीही मदत
युद्धादरम्यान युक्रेनची इंटरनेट सेवा काेलमडली हाेती. अशावेळी मस्क यांनी आपल्या कंपनीचे स्टारलिंक सॅटेलाइट पाॅइंट युक्रेनला देऊन इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वी मस्कशी दूरध्वनीवरून चर्चा केली हाेती.