Twitter Blue Tick Controversy: सेलिब्रिटी, पत्रकार किंवा नेतेमंडळींना मोफत ब्लू टिक्सचा आनंद घेता आला असला तरी ट्वीटरचे मालक एलॉन मस्क यांना मात्र ते फारसे पटलेले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्कने ब्लू टिक मार्कसाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले होते. या घोषणेनंतर जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. तथापि, काल मध्यरात्री अचानक काही सेलिब्रीटी मंडळींच्या ब्लूय टिक्स अचानक गायब झाल्या. कुणाला ब्लू टिक ठेवायची असेल तर ब्लू सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल असेही सांगण्यात आले. मात्र काही लोकांना अद्यापही पैसे न देताही ब्लू टिक मिळाल्याने लोकांना आश्चर्य वाटत आहे.
ट्विटरचा कारभार हाती घेतल्यापासून एलॉन मस्क कमाईचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. ब्लू सबस्क्रिप्शन योजना देखील त्यापैकी एक आहे. हा उपक्रम गेल्या वर्षीच सुरू करण्यात आला होता. मस्क यांनी स्पष्ट केले होते की जे ब्लू सबस्क्रिप्शन खरेदी करतील त्यांनाच ट्विटरवर ब्लू टिक मिळेल. आता जर तुम्हाला कोणाची ब्लू टिक दिसली तर समजून घ्या की यासाठी मासिक फी दिली जात आहे.
ब्लू टिक साठी पैसे देण्यास विरोध
ब्लू टिकसाठी पैसे आकारण्याच्या धोरणाला अनेक सेलिब्रिटींनी कडाडून विरोध केला होता. एनबीए सुपरस्टार लेब्रॉन जेम्स आणि अमेरिकन लेखक स्टीफन किंग ही त्यांच्यापैकी मोठी नावे आहेत. या दोघांनीही आपण ब्लू टिकसाठी पैसे देणार नसल्याचे स्पष्टपणे नाकारले होते. त्यांनी ब्लू सबस्क्रिप्शन घेतलेले नाही, तरीही त्यांच्या खात्यावर ब्लू टिक कायम आहे.
पैसे न भरूनही 'ब्लू टिक' कायम कसं?
एलॉन मस्क आणि ट्विटरच्या धोरणावर टीका करणाऱ्या या सेलिब्रिटींच्या ब्लू टिक्स अजूनही कायम आहेत हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. जेम्स आणि किंगची ब्लू टिक्स पैसे न देता कशी राहिली याबद्दल वापरकर्ते खूप गोंधळलेले आहेत. मात्र, हे समजणे फार मोठे रहस्य नाही. काही सेलिब्रिटींना ब्लू टिक्स मोफत ठेवण्याची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन निवडक खात्यांना पूर्णपणे मोफत देण्यात आले आहे., एलॉन मस्क स्वत: या लोकांच्या सबस्क्रिप्शनसाठी पैसे देत आहेत.
--
--
एलॉन मस्क यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ते काही लोकांसाठी स्वतःहून पैसे खर्च करत आहेत. विल्यम शॅटनर (जस्ट शॅटनर), लेब्रॉन जेम्स, स्टीफन किंग ही नावे यात समाविष्ट आहेत, ज्यांच्या ब्लू सबस्क्रिप्शनसाठी मस्क पैसे देत आहेत. ब्लू सबस्क्रिप्शनला नाही म्हणणाऱ्या स्टीफन किंगनेही याप्रकरणी एक ट्विट केले आहे. किंग म्हणाले की, त्यांनी ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घेतलेले नाही किंवा त्यांचा मोबाईल नंबरही दिला नाही. यानंतरही त्याची ब्लू टिक आहे. यावर इलॉन मस्क यांनी नमस्तेने त्यांचे स्वागत केले.