जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) ट्विटरवर खूप सक्रिय आहे. ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर नेहमी ट्विटरद्वारे आपले मत मांडत असतात. पण, आता एका ट्विटमुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. बुधवारी एलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो(Justin Trudeau) यांची तुलना अॅडॉल्फ हिटलरशी(Adolf Hitler) केली होती.
ट्विट का केले ?
एलोन मस्क यांनी बुधवारी हे ट्विट केले होते. कॅनडामध्ये ट्रकचालकांचे आंदोलन सुरू आहे, त्याला समर्थन देण्यासाठी मस्क यांनी हे ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला, त्यानंतर गुरुवारी त्यांनी काहीही स्पष्टीकरण न देता त्यांचे ट्विट डिलीट केले, पण तोपर्यंत हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले.
ट्विटमध्ये काय होते ?एलॉन मस्क यांनी जानेवारीतही कॅनेडियन ट्रक चालकांच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. त्यावेळेस कॅनडा सरकारच्या आरोग्य धोरणाच्या निषेधार्थ ट्रकचालकांनी बंदची घोषणा केली होती. यानंतर आता बुधवारी मस्क यांनी पुन्हा ट्रक चालकांच्या समर्थनार्थ ट्विट केले. यावेळी त्यांनी एक मीम फोटो शेअर केला. त्या मीममध्ये हिटलरचा फोटो होता आणि त्यावर लिहिले होते, 'माझी जस्टिनशी तुलना करणे थांबवा. माझ्याकडे बजेट होते', अशा आशयाचा हा फोटो होता.
मस्क यांनी माफी मागावीया ट्विटवरुन मोठ्या प्रमाणात लोक मस्क यांच्यावर टीका करत आहेत. या चुकीसाठी काही लोकांनी मस्कला शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यावर अनेकजण टीका करत आहेत. अमेरिकन ज्यू कमिटीनेही यावर टीका केली असून मस्क यांना माफी मागण्यास सांगितले आहे.