टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात. आता त्यांनी त्यांच्या मरण्याबद्दल ट्विट केलं आहे. मात्र यामुळे त्यांच्यावर ओरडली. एलन यांनी केलेलं ट्विट त्यांच्या आईला आवडलेलं नाही.
'जर मी संशयास्पद स्थितीत मरण पावलो तर..', असं ट्विट एलन मस्क यांनी केलं होतं. एलन यांच्या ट्विटला त्यांच्या आईनं उत्तर दिलं. 'ही गंमत नव्हे,' अशा मोजक्या शब्दांत आईनं मस्क यांना सुनावलं. त्यावरून मस्क यांनी आईची माफी मागितली. 'माफ कर! मी जिवंत राहण्याचा पूर्ण प्रयत्न करेन,' असं एलन म्हणाले.
एलन मस्क यांचे ट्विटरवर ९ कोटींहून अधिक फॉलोअर आहेत. मस्क यांनी ट्विटमधून थेट मरणाची आणि तीही संशयास्पद स्थितीत मरण्याची भाषा केल्यानं ट्विटरवरील त्यांचे चाहते चिंतेत पडले. 'तुम्ही मरणार नाही. जगाला तुमची गरज आहे', असं ट्विट एका यूजरनं केलं. तर दुसऱ्या एका यूजरनं 'आम्हाला कोणत्याही स्थितीत, कितीही किंमत मोजून तुमचं रक्षण करायला हवं. माणुसकीचा तुमच्यावर विश्वास आहे,' अशा शब्दांत स्वत:च्या भावना व्यक्त केल्या.
मस्क यांचं नेमकं ट्विट काय?मस्क यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, 'जर संशयास्पद परिस्थितीत माझा मृत्यू झाला, तर हे nice knowin ya असेल.' मस्क यांच्या या ट्विटचा अर्थ स्पष्टपणे कुणालाही समजलेला नाही. मात्र, मस्क येथे Nice Knowin' Ya या गाण्याचा उल्लेख करत असल्याचा अंदाज लावला जात आहे.