Elon Musk on Bangali signboard in London Controversy : महाराष्ट्रात मराठीतच बोलायचं, लिहायचं आणि वाचायचं असा मराठी माणसाचा आग्रह असतो. काही लोक याचे समर्थन करतात, तर काही लोक टीका करतात. पण भाषेचा हा वाद केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही तर थेट लंडनपर्यंत पोहोचला आहे. लंडन रेल्वे स्थानकावरील बंगाली भाषेत लिहिलेला साइनबोर्ड हा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे. यावरून वाद सुरू झाला असून प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनीही या वादात उडी घेतली आहे.
नेमका काय आहे प्रकार?
लंडनमधील व्हाईटचॅपल स्टेशनच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या साइनबोर्डवर इंग्रजी भाषेसह बंगाली भाषेचाही वापर करण्यात आला आहे. त्यावर एका ब्रिटीश खासदाराने आक्षेप नोंदवला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार लंडनमध्ये स्टेशनच्या साइनबोर्डवर फक्त इंग्रजीच वापरली पाहिजे. या साइन बोर्डवरून ब्रिटनमध्ये गदारोळ झाला आहे. ग्रेट यार्माउथचे खासदार रूपर्ट लोव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हाईटचॅपल स्टेशनवर इंग्रजी आणि बंगाली भाषेत लिहिलेला साइनबोर्ड दाखवणारा एक फोटो पोस्ट केला. लोव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'हे लंडन आहे - स्टेशनची नावे इंग्रजीत आणि फक्त इंग्रजीत असावीत.'
एलॉन मस्क यांनी केलं मागणीचं समर्थन
ब्रिटीश खासदाराची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यानंतर काही प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाच्या बातम्याही प्रसिद्ध केल्या. यावर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी खासदाराच्या मताचे समर्थन केले, तर काहींनी दोन भाषांमध्ये साइनबोर्ड असणे ठीक आहे असे म्हटले. या पोस्टची दखल थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनीही घेतली. त्यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि खासदारांच्या विधानाचे समर्थन केले.
साइनबोर्ड २०२२ मध्ये बसवण्यात आला
लंडनच्या व्हाईटचॅपल स्टेशनच्या बाहेर इंग्रजी तसेच बंगाली भाषेतील साइनबोर्ड २०२२ मध्ये बसवण्यात आला होता. या भागातील बांगलादेशी समुदायाच्या योगदानाची दखल घेऊन तो बंगालीमध्येही लिहिण्यात आला होता. पूर्व लंडनमध्ये बंगाली वंशाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे हा निर्णय घेतला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निर्णयाचे कौतुक केले होते.