Elon Musk Town: जगातील दुसऱ्या नंबरचे सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) स्वतःचे शहर वसवण्याच्या विचारात आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. इलॉन मस्क आणि त्यांच्या कंपनीशी संबंधित संस्था टेक्सासमध्ये हजारो एकर जमीन संपादित करत असल्याची माहिती आहे. मस्क यांच्या शहरात त्यांच्या कंपनीचे कर्मचारी राहतील आणि काम करतील. ऑस्टिनजवळ किमान 3,500 एकरांवर या मालमत्ता खरेदी करण्यात आल्या आहेत. 'स्नेलब्रुक' असे या शहराचे नाव असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
मस्क ज्या भागात शहर बसवण्याचा विचार करत आहेत, ते बांधकामाधीन बोरिंग आणि स्पेस-एक्स प्लांट्सजवळ आहे. हे ठिकाण टेक्सासमधील कोलोरॅडो नदीच्या काठावर आहे. मस्कच्या कंपन्यांचे कर्मचारी येथे राहतील आणि जवळच असलेल्या कंपन्यामध्ये कामाला जातील. रिपोर्टनुसार, 100 घरे बांधण्याची योजना असून, इथे एक पूल आणि एक खुले खेळाचे मैदानही तयार केले जाईल. यापूर्वी, 2020 च्या सुरुवातीला इलॉन मस्क यांनी घोषणा केली होती की, ते टेस्लाचे मुख्यालय आणि त्यांचे घर कॅलिफोर्नियाहून टेक्सासमध्ये हलवणार आहेत.
आपल्या कर्मचाऱ्यांना स्वस्त घरे उपलब्ध करुन देण्याची मस्क यांची योजना आहे. असे सांगितले जात आहे की, महिन्याला सुमारे 65,000 रुपयांच्या किमतीत एक आणि दोन बेडरूमचे घर उपलब्ध करून देण्याची मस्क यांची योजना आहे. पण, कंपनीतील कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यास किंवा नोकर कपात झाल्यास त्यांना 30 दिवसांच्या आत घर रिकामे करावे लागेल, असाही नियम असेल.